सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शहाणपण आणि संवेदनशीलतेमुळे आज भारतीय एकसंध- पंतप्रधान

“मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन 

नवी दिल्ली: सरदार वल्लभभाई पटेल यांचे अचूक शहाणपण, संवेदनशीलता आणि डावपेचात्मक कौशल्य यामुळे सारे भारतीय एका माळेत गुंफले गेले, असे प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. “मन की बात’ या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुजरात राज्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच ठरणारा गगनचुंबी “स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा पुतळा पटेल यांच्या जयंतीदिनी देशाला अर्पण केला जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. 31 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या “रन फॉर युनिटी’ मध्ये लोकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

भारतीय क्रीडा क्षेत्रात प्रत्येक दिवशी नवनवीन सुधारणा दिसून येत आहेत. शक्ती, कौशल्य आणि कुवत हे क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून, देशातील तरुणांनी हे गुण आत्मसात केले, तर केवळ आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही देशासाठी नवनवीन किर्तीमान प्रस्थापित होतील, असे ते म्हणाले. 2018 च्या “समर युथ ऑलंपिक’ मधील भारतीय युवकांच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.

गेल्यावर्षी भारताने 17 वर्षाखालील फिफा जागतिक चषक स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. यावर्षी भुवनेश्वर इथे जागतिक हॉकी चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. हॉकीमध्ये भारताचा देदिप्यमान इतिहास असून, भारताने मेजर ध्यानचंद यांच्या सारखे अलौकीक खेळाडू जगाला दिले आहेत. याची आठवणही पंतप्रधानांनी करून दिली.
माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहित करण्याकरता सुरु करण्यात आलेल्या “सेल्फ फॉर सोसायटी’ या पोर्टलचा त्यांनी उल्लेख केला. “वूई नॉट आय’ ही भावना लोकांना नक्कीच प्रोत्साहित करेल, असेही त्यांनी सांगितले.

छोट्या लोकांपासून आपल्याला प्रेरणा मिळू शकते आणि याच लोकांमध्ये दृढ तत्व, नवीन मार्ग अधिक सक्षम करु शकतात. पंजाबमधील गुरबचन सिंग या शेतकऱ्याने शेतातील तण जाळू नयेत असे आवाहन केले. पंजाबमधल्या कलार माजरा या खेड्यातील शेतकरी हे तण न जाळता नांगराद्वारे शेतातच पुन्हा गाडत आहेत. हे शेतकरी पर्यावरण स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी उत्तम प्रयत्न करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

दहशतवाद, वातावरण बदल, आर्थिक विकास तसेच सामाजिक न्याय यासारख्या विषयांवर जागतिक सहकार्य आणि समन्वयांने कार्य करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. शाश्वत अन्न प्रणालीला प्रेरणा देण्यासाठी “फ्यूचर पॉलिसी गोल्ड वॉर्ड 201’8 जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी सिक्कीमचे अभिनंदन केले. ईशान्य भारताने सेंद्रिय शेती क्षेत्रात भरीव विकास केला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी धनतेरस, दिपावली, भाऊबीज आणि छट पूजेबद्दल देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)