सरकार झुकले; अंगणवाडी सेविकांवरील मेस्माला स्थगिती

मुख्यमंत्र्यांची घोषणा : वाढीव मानधन देण्यासाठी 126 कोटी वितरीत
मुंबई – अंगणवाडी सेविकावर लावण्यात आलेल्या मेस्माचे समर्थन करणारे भाजप सरकार अखेर सत्ताधारी शिवसेना तसेच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आक्रमक भूमिकेपुढे झुकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत, तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत मेस्माला (महाराष्ट्र अत्यावश्‍यक सेवा परिरक्षण अधिनियम) स्थगिती देण्यात आल्याची घोषणा केली.

अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेल्या मेस्माचे अर्थसंकल्पिय अधिवेशात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संतप्त पडसाद उमटले होते. मेस्मा रद्द करावा या मागणीसाठी बुधवारी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पाडले होते. सत्ताधारी शिवसेना व विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहातील कामकाजाची कोंडी निर्माण झाली होती. अखेर मेस्मा कायदा स्थगित करण्यासंदर्भात विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी, तर विधानपरिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे निवेदन दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील एक लाख 99 हजार 349 अंगणवाडी सेविकांनी 11 सप्टेंबर 2017 ते 8 ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत संप केला होता. संपकाळात कुपोषणामुळे बालकांचा मृत्यु झाल्याचे निदर्शनात आले. या दरम्यान कुपोषणाने बालकांचा मृत्यु झाल्याचे डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करून निदर्शनास आणून दिले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्र अत्यावश्‍यक सेवा परिरक्षण अधिनियम (मेस्मा) लागू करण्यात आला होता.

या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किमान 300 दिवस मुलांना पुरक पोषण आहार मिळण्यासाठी अंगणवाडी केंद्रामधील सेवांचा महाराष्ट्र अत्यावश्‍यक सेवा परिरक्षण अधिनियम, 2017मध्ये समावेश करण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र या संदर्भातील सभागृहाच्या भावना लक्षात घेता, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस, यांना या अत्यावश्‍यक सेवा परिक्षण कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर काढण्यात आलेला दि. 15 मार्च, 2018 रोजीचा मनाई हुकूम स्थगित करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना दि. 1 ऑक्‍टोबर 2017 पासून सेवा ज्येष्ठतेनुसार मानधनवाढ, भाऊबीज भेट रकमेत वाढ, दि. 23 फेब्रुवारी 2018च्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आली असून वाढीव मानधनाची रक्कम म्हणून 126 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)