सरकार-काश्‍मिरी नागरिक यांच्यात संवादाचा अभाव

काश्‍मीरचे माजी पोलीस महासंचालक के. राजेंद्रकुमार यांचे मत

पुणे – “आयुष्यभर मंदिरातील घंटेऐवजी बंदुकीच्या गोळ्यांचा, लोकांच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकत वाढलेली एक पूर्ण पिढी काश्‍मिरात आहे. या पिढीमध्ये प्रचंड असंतोष आहे. ऐके काळी “कबालिया होशियार, काश्‍मिरी है तैयार’ असा नारा देत पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात उभे असणारे काश्‍मिरी नागरिक आज भारतीय सैन्य दल आणि पोलीस यांच्यावर दगडफेक करत आहेत. या सर्वांचे मूळ भारत सरकार आणि काश्‍मिरी नागरिक यांच्यामधील संवादाचा अभाव आहे. त्यामुळे सरकारने काश्‍मीरबाबत इतर कोणाशी चर्चा करण्याऐवजी आधी तेथील जनतेशी चर्चा केली पाहिजे,’ असा सल्ला जम्मू-काश्‍मीरचे माजी पोलीस महासंचालक के. राजेंद्रकुमार यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ललितादित्य स्मृती व्याख्यानात “जम्मू-काश्‍मीर पोलिसांसमोरील आव्हाने’ याविषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र आणि पंजाब राज्याचे माजी पोलीस महासंचालक एस. एस. विर्क, लेखक संजय सोनवणी, संस्थेचे संस्थापक संजय नहार, विश्‍वस्त शैलेश वाडेकर उपस्थित होते.

कुमार म्हणाले, “काश्‍मीरमध्ये आपण केवळ शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो, तेथील नागरिकांना आपलेसे करण्यासाठी आपल्याकडे कोणतेही ठोस धोरण नाही. याउलट पाकिस्तानमध्ये कोणतेही सरकार आले, तरी त्यांचा मूळ ध्येय हे काश्‍मीरला भारतापासून विभक्त करणे हेच असते. काश्‍मीरला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आधी काश्‍मीरमधील जनतेला ते आपलेच आहे याची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे आणि यासाठी भारत सरकारने एक ठोस धोरण तयार केले पाहिजे.”

विर्क म्हणाले, “एखाद्या राज्याचा ताबा जेव्हा विशेष पथकाकडे दिला जातो. विशेषत: एकापेक्षा जास्त पथके त्याठिकाणी कार्यरत असतात, त्यावेळी त्यांच्यातील अधिकारांच्या विषयावरून त्या ठिकाणाच्या देखभालीवर परिणाम नक्कीच होतो. काश्‍मीरमध्ये सद्यस्थितीत स्थानिक पोलीस, लष्कर, आयटीबीपी अशी विविध विशेष पथके कार्यरत आहेत. त्यांचा नक्कीच तेथील नागरी जीवनावर परिणाम होत असावा. ही परिस्थिती टाळण्यासाठी या “फोर्सेस’चे एकत्रीकरण अथवा विभक्तीकरण करून प्रत्येकाकडे स्वतंत्र प्रदेशाचा ताबा दिला पाहिजे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)