सरकार आमचे फोन टॅब करतेय

राजू शेट्टी यांचा आरोप; दुधाच्या आंदोलनावर ठाम

नगर – राज्य सरकारने सत्तावीस रुपये प्रतिलिटर भावाने खरेदी किंवा प्रती लिटर पाच रुपये अनुदान जमा केल्याशिवाय आम्हाला आमचे दूध विकायचे नाही, असा आमचा
निर्णय आहे. आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करीत आहे. माझ्यासह सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन टॅब केले जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी केला. मोफत दूध वाटू; पण दूध विकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोमवार (ता. 16) पासून मुंबईचा दूध पुरवठा बंद करण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळावा, असे सरकारला वाटत नाही. वर्षानुवर्षे दुधावर गलेलठ्ठ झालेल्यांचे सरकार कल्याण करताना दिसत आहे. दूध पावडरीसाठी प्रतिकिलो पन्नास रुपये अनुदान हे त्यातलेच एक उदाहरण आहे. ज्यांनी पावडर निर्माण केली आहे, त्यांनी शेतकऱ्यांकडून पंधरा ते सोळा रुपये दराने दूध खरेदी केलेले आहे. यापूर्वी दूध पावडर अनुदानासाठी 53 कोटी रुपये खर्च झाले. सरकारचा तो फसला. आताचा सरकारचा हा प्रयत्नही
वाया जाणार आहे. गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल यांनी आंदोलनाला
पाठिंबा दिला आहे. गुजरातमधून दूध येऊ देणार नसल्याचे त्यांनी संगितले
आहे.
सरकारने नुकतीच जाहीर केलेली हमीभावातील वाढ तसेच दीडपट भावाची भाषा ही सरळसरळ फसवणूक आहे, अशी टीका करून श्री. शेट्टी म्हणाले,”” 2014 साली लागणारा खर्च धरून हे दर जाहीर केले आहेत. त्यावर्षी आणि आता म्हणजे चार वर्षांच्या खर्चांच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. शेतकरी दूध विकणार नाही; मात्र विकणारच असतील, तर संरक्षण देतो असे म्हणण्याचा अधिकार सरकारला आहे; मात्र दूध उत्पादकांवर दूध विकण्याची
सक्ती सरकार करू शकत नाहीत. सक्ती करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही जशाच तसे
उत्तर देऊ. आम्हाला आमचा धंदा तोट्यात करायचा नाही. पंधरा तारखेला रात्री
बारा वाजता ग्रामदैवताला अभिषेक घालून आंदोलनाला सुरवात होईल. शेतकऱ्यांनी थेंबभर ही दूध विकू नये.”
या वेळी जिल्हाध्यक्ष रवी मोरे, शेतकरी नेते गुलाबराव डेरे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)