सरकारी योजना दलालमुक्‍त व्हाव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सारथ्य समाज विकास मेळाव्याचे उद्‌घाटन

पुणे, दि.30 – सरकारी योजनांमध्ये भीती असते ती दलालांची. या दलालांनी या योजना लूटून नेऊ नयेत म्हणून सकारात्मक विचारांच्या संघटनानी एकत्रित येऊन सरकार आणि लाभार्थी यांच्यात पूल बनण्याचे काम केले, तर दलालांची गरजच भासणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

-Ads-

अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) पुणे विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सारथ्य समाज विकास मेळाव्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, महापौर मुक्ता टिळक, कृष्णकुमार गोयल, “अनुलोम’चे प्रमुख अतुल वझे, पुणे विभागप्रमुख अनिल मोहिते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारी योजना म्हटले, की दलालांची गर्दी सुरू होते. हे दलाल या योजनांचा लाभ सर्वसामान्यापर्यंत पोहचू देत नाहीत. हे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही शासकीय योजनांचे डिजीलायटेझन केले. सर्व सुविधा ऑनलाइन केल्याने आम्हाला आता त्याचा फायदा होत आहे. त्याचबरोबर चांगल्या सकारात्मक विचार करणाऱ्या संस्थांनी जर सेतू म्हणून यामध्ये मदत केली, तर या योजना आणखी चांगल्या पद्धतीने सरकारपर्यंत पोहचतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

ते म्हणाले, समाजात 80 टक्के सज्जन शक्ती असते. तर 20 टक्के ही दुर्जनशक्ती असते. पण, सज्जनशक्ती ही शांत बसलेली आहे. मला काय करायचे या भावनेतून ती गप्प आहे. त्यामुळे दुर्जनशक्ती मोठ्या झाल्या आहेत. त्यांचा अविष्कार मोठा वाटतो. दुर्जनशक्तीचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आपल्या समाजात सकारात्मकता निर्माण होण्याची गरज आहे. ही सकारात्मकता निर्माण करण्यासाठी सज्जनशक्ती जागृत झाली पाहिजे. जर का 80 टक्के सज्जनशक्ती एकत्र आली, तर आपण दुर्जनशक्ती पळून लावू शकतो. महापौर मुक्ता टिळक यांनी स्वागत केले तर प्रास्ताविक अनिल मोहिते यांनी केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)