सरकारी दवाखान्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला

  • जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांचे आवाहन; बारामतीत महाआरोग्य शिबीर

बारामती – सरकारी दवाखान्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची आवश्‍यकता असून समाजातील गोरगरीब, वंचित घटकांसाठी हेच दवाखाने आधारवड ठरले आहेत. गोरगरीबांना खासगी दवाखान्यांचा खर्च परवडणारा नसतो, त्यामुळेच सर्व गरजु घटकापर्यंत महाआरोग्य शिबीराची माहिती पोहचवावी. या शिबीरात तपासणी होऊन पुढे जर उपचाराची गरज भासली तर शासकीय योजनांतर्गत उपचारासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद आरोग्य विभाग, बारामती नगरपरिषद यांच्या माध्यमातून रविवारी (दि.13) “महाआरोग्य निदान शिबीरा’चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची माहिती देण्याकरिता सदस्य रोहित पवार यांनी तालुक्‍यातील मुरुम, मोरगाव, सुपा, निंबूत, करंजेफुल, मेडद, कांबळेश्वर, माळेगाव, गुणवडी, शिर्सुफळ आदी ठिकाणी दौरे करून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शिबीरासंबंधी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देत शिबीराचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.
पुणे जिल्ह्यात अजित पवार याच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक तालुक्‍यात अशा शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील शेवटचे शिबीर बारामती तालुक्‍यात होत आहे. हे शिबीर महिला ग्रामीण रुग्णालय, एम.आय.डीसी बारामती येथे रविवारी होणार आहे. या शिबीरात विविध प्रकारच्या सर्व आजार विकारांवरील तपासण्या करून निदान झाल्यास पुढील उपचार, शस्त्रक्रिया शासकीय धोरणानुसार मोफत करण्यात येणार आहे. या शिबीरात तालुक्‍यातील सर्व गावच्या, वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना सहभागी होता यावे याकरिता रुग्णवाहिका आणि एसटी बस आणि खासगी वाहनांची मोफत सोय करण्यात आली आहे. विविध संस्था, संघटना, व्यक्ती यांनी या शिबीराला पाठिंबा दिला असून सर्वांच्या सहभागातून हे शिबीर गरजू घटकांपर्यंत पोहचवून यशस्वी करावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती पं.स. सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरषोत्तम जगताप, माजी सभापती करण खलाटे, जि.प. सदस्य भारतनाना खैरे, प्रमोद काकडे, मिनाक्षी तावरे, रोहिणी तावरे, भारत नाना गावडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांच्यासह गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, आशा स्वयंसेविका, राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)