सरकारी जमिनींच्या वापरावर सामान्यांचा “वॉच’

वाटपाच्या उद्देशाला बगल देत व्यावसायिक उपयोग : अटींचा केला भंग

पुणे – जिल्ह्यात शैक्षणिक कारणासाठी वाटप केलेल्या सरकारी जमिनींचा वापर योग्य पध्दतीने होतो की नाही, यावर आता सामान्य नागरिकांची नजर राहणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने 1992 ते 2014 या काळात शैक्षणिक हेतूसाठी कब्जेहक्काने व भाडेपट्याने दिलेल्या जमिनींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

राजकीय बडे नेते, मोठ्या शैक्षणिक संस्थांना तसेच स्वयंसेवी संस्थांना शैक्षणिक आणि तत्सम कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी जमीन वाटप करण्यात आली आहे. काही संस्थांनी सरकारी जमीन घेऊन वीस-पंचवीस वर्षे त्या वापरातच आणलेल्या नाहीत. काही संस्थांनी जमीन वापर करताना अटींचा भंग केला आहे. काही संस्थांनी सरकारी जमीन ज्या कारणासाठी वाटप झाली, त्यासाटी वापर न करता व्यावसायिक कारणासाठी उपयोगात आणली आहे.

सरकारी जमीन वाटपाचा शर्तभंग केलेल्या संस्थांना मध्यंतरी नोटीस देऊन जमीन पुन्हा सरकारजमा करण्याची तंबी देण्यात आली आहे. निर्धारित काळात जमीन वापर न केलेल्या काही संस्थांकडून ती काढून घेण्याची कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात शेकडो एकर सरकारी जमिनीचे वाटप झाले आहे. परंतु या जमिनीच्या वापरावर सरकारचा फारचा अंकुश नसल्याने त्याचा गैरवापर होत आहे. अशा संस्थांकडून जमिनीचा योग्य वापर व्हावा, यासाठी नागरिकांमार्फत त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर सरकारी जमीन वाटपाची माहिती खुली केली आहे.

जमिनीसंबंधी माहिती संकेतस्थळावर

पुणे जिल्ह्यात 1960 पासून काही संस्थांना सरकारी गायरान जमीन शैक्षणिक व अन्य कारणासाठी वाटप केली आहे. 1992 ते 2014 या काळात शैक्षणिक हेतूसाठी कब्जेहक्काने व भाडेपट्याने दिलेल्या जमिनींची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1992 ते 2014 या काळात 111 ठिकाणचे भूखंड शैक्षणिक संस्थांना वाटण्यात आले आहेत. या संस्था, त्यांना केलेली जमीन वाटप, जमिनीचा सर्व्हे क्रमांक, कोणत्या प्रयोजनासाठी जमीन वाटप केली, या जमीन वाटपाच्या अटी व शर्ती तसेच जमिनीचा वापर सध्या कशासाठी होत आहे, याची माहिती संकेतस्थळावर टाकली आहे. ही माहिती पाहिल्यानंतर नागरिक संबंधित संस्थेकडून होत असलेल्या जमिनीच्या वापरावर लक्ष ठेऊ शकणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)