सरकारमधून बाहेर पडण्याबाबत राजू शेट्टी घेणार बुधवारी निर्णय

कोल्हापूर – सरकारमधून बाहेर पडण्याबाबत बुधवारी निर्णय घेणार आहे, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेला शब्द न पाळून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा व्हावा व शेतीमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करून सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ते इस्लमपूर येथे झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. तसेच बदल्यांची दुकानदारी चालविणे, वाईट कामासाठी प्रशासनाला वेठीस धरणे, ठेके देऊन टक्केवारी उकळणे हे आमचे काम नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी लढणे हेच आमचे काम आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

खा. शेट्टी पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभातून शेतकऱ्यांना दिलेले आश्‍वासन आजपर्यंत पाळलेले नाही. त्यामुळे देशभरातील 162 शेतकरी संघटना या प्रश्‍नावर एकत्र झाल्या आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी दिल्लीला देशभरातील 10 लाख शेतकऱ्यांचा मोर्चा काढून या मागण्यांवर सरकारला गुडघे टेकायला लावू.

गर्दीला आमिष दाखवावे लागत नाही

खोत यांचा नामोल्लेख टाळत खा. शेट्टी म्हणाले, जो चळवळीशी एकनिष्ठ राहतो त्याला गर्दी जमवावी लागत नाही. आमिष दाखवावे लागत नाही. आपोआप गर्दी होत असते. ज्यांनी संघटनेचा विचार, प्रवाह सोडला नाही ते लोक आज येथे आले आहेत. शेतकऱ्यांची ही चळवळ म्हणजे जनता गाडीच आहे. यामध्ये काहीजण चढतात. काहीजण उतरत असतात. आम्ही आजपर्यंत लोकांना फसवून टक्केवारीचा बाजार कधी मांडला नाही. बदल्यांची दुकानदारी चालविली नाही. ते म्हणाले, राज्य व केंद्र सरकारची धोरणे शेतकरीविरोधीच आहेत. कर्जमाफी फसवी आहे. तिचा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही. त्यामुळे वाईटाला वाईट व चुकीला चूक म्हणण्यात मला काहीच भिती नाही. जे कोणी याला चांगले म्हणत असेल तर त्यांना मी अडवू शकत नाही. जिल्हाध्यक्ष विकास देशमुख म्हणाले, विरोधकांची सर्व अस्त्रे संपल्याने त्यांनी आता जातीयवादाचे अस्त्र काढले आहे, पण तेही नाकाम होईल. सयाजी मोरे म्हणाले, सदाभाऊ यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी खा. शेट्टी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवावी.

जालिंदर पाटील, महेश खराडे, तानाजी साठे, प्रवीण पाटील, संदीप नलवडे, विरेंद्र राजमाने, ऍड. एच.आर. पवार, आप्पासाहेब पाटील, ऍड. एस.यू. संदे, राम पाटील, राजाभाऊ दुकाने यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सयाजी मोरे, विरेंद्र राजमाने, धैर्यशील पाटील, सिकंदर नायकवडी आदिंनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)