सरकारने शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे – बाळासाहेब थोरात

संगमनेर – दुध आणि ऊस या दोन पिकातुन शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळते. मात्र शासनाच्या उदासिनतेमुळे आज हे दोन्ही अडचणीत सापडले आहेत. अडचणीच्या काळात सरकारने पाठीशी राहत मदत करण्याची आवश्यकता असते मात्र असे होतांना दिसत नसल्याने संघटितपणे सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले पाहिजेत, असे प्रतिपादन माजीमंत्री व आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०१७-१८ च्या सुवर्ण महोत्सवी गळीत हंगामाची सांगता आज झाली त्यावेळी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे होते.व्यासपिठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख,शिवाजीराव थोरात, भाऊसाहेब कुटे, रामदास वाघ आदी उपस्थित होते.

-Ads-

यावेळी बोलतांना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, साखर कारखान्याच्या गळीतादरम्यान अनेक चाके दिवसरात्र फिरत असतात. सुमारे सहा महिने सुरु असलेला आपला हंगाम निर्विघ्नपणे पार पडला. हंगामाच्या काळात ११ लाखावर अधिक टनाचे गाळप करण्यात आपण यशस्वी ठरलो. चांगला पाऊस झाल्याने राज्यात सगळीकडेच साखरेचे उत्पादन वाढले आहे. हंगामात साखरेचे भाव अडीच हजार रुपयांपर्यत खाली आले. बँकादेखील दिड हजारावर पैसे द्यायला तयार नाहीत. अशा स्थितीत सहवीज निर्मीतीतुन चांगला हातभार लागला आहे. जवळपास ५५ कोटीचे उत्पन्न यातुन मिळाले.

आपण काटकसरीला प्राधान्य दिले. एफआरपी द्या असे सांगतांना सरकार दुसरीकडे कोसळणाऱ्या साखरेच्या दराचा विचार करतांना दिसत नाही.खरतर अशा वेळी सरकारने पाठीशी राहायला हवे मात्र तसे होत नाही. साखरेसोबतच दुधाचीदेखील अवस्था वाईट झाली आहे. पंधरा-सोळा रुपये लिटरने शेतकऱ्यांकडून दूधाची खरेदी सुरु आहे.

सरकारने दुध पावडर परदेशात पाठविण्यासाठी त्यावर टॅक्स लावल्याने ही पावडर पडून आहे. सहकारावर बंधने लादणारे सरकार खासगी डेअऱ्यांना नियमावली लावत नाही. आपला दुध संघ अशा स्थितीतही शेतकऱ्यांसोबत आहे. सरकार अनेक प्रकारचे टॅक्स आमच्या कडून घेते मात्र हा पैसा अडचणीत काळात आपल्याला न देता तो बुलेट ट्रेन, मेट्रोसिटी, समृध्दीसाठी वापरला जात असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)