सरकारच्या केवळ घोषणाच

मंचर- सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करते; परंतु घोषणा करण्याऐवजी कृतीमध्ये अंमलबजावणी होत नसल्याचा अनुभव जनतेचा आहे. मराठा आरक्षण देण्यासंदर्भातही सरकारने घोषणा केली असली तरी त्यावर मात्र, जनतेचा विश्‍वास उरला नाही. प्रत्यक्ष मराठा आरक्षण कसे असेल यावरच बरेच काही अवलंबून आहे, असे मत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी सोमवारी व्यक्त केले.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा संवाद यात्रेचे मंचर बाजार समितीच्या आवारात स्वागत करताना सभापती निकम बोलत होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्याचे समन्वयक शांताराम कुंजीर, रघुनाथ चित्रे पाटील, रमेश हांडे, पांडुरंग थोरात, निमंत्रक शरद पोखरकर, बाळासाहेब थोरात समवेत अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे आंबेगाव तालुक्‍याचे समन्वयक शरद पोखरकर यांनी सरकार फक्त आश्‍वासने देत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज तातडीने देऊ असे सांगते; परंतु कर्ज देताना नियम, अटी घातल्यामुळे सहजपणे कर्ज मिळत नसल्याचा तरुणांच्या व्यथा त्यांनी मांडल्या.
ऍड सुनिल बांगर यांनी मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे आवाहन केले. मराठा मोर्चाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर यांनी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सरकारने घोषणा केली; परंतु कायदा झाल्याशिवाय आरक्षण मजबूत होणार नाही. तसेच मागील कर्जमाफीमध्ये अनेक शेतकऱ्यांना नियम आणि अटीमुळे लाभ मिळाला नाही. नियम आणि अटी बाजूला करुन राहिलेल्या सर्वांना कर्जमाफी दिली पाहिजे. मराठा आरक्षण मिळविण्यासाठी 26 नोव्हेंबरला विधानभवनावर लाखोंच्या संख्येने मोर्चा धडकणार आहे. यामध्ये सर्व कामे बाजूला ठेऊन सर्वांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी दादाभाऊ बांगर, यशवंत इंदोरे यांची भाषणे झाली. आभार दादाभाऊ पोखरकर यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)