सरकारचे गुलाम नाही, शून्य मिनिटात बाहेर पडू

रिपाइं जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांचा इशारा
संविधान सन्मानार्थ सोमवारी सर्वपक्षीय आंदोलन

सातारा,दि.11 प्रतिनिधी- सरकारच्या सोबत असलो तरी आम्ही त्यांचे गुलाम नाही. संविधानाचा सन्मान होत नसेल तर शून्य मिनिटात सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा रिपाइं जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला. संविधानाच्या सन्मानार्थ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, संघटक गणेश भिसे यांच्यासह दादासाहेब ओव्हाळ, शरद गायकवाड, सचिन वायदंडे, शुक्राचार्य भिसे, अप्पा तुपे, फारूक पटनी, गणेश कारंडे आदी.उपस्थित होते.

-Ads-

दिल्ली येथे जंतरमंतर परिसरात संविधानाच्या प्रती जाळण्याच्या घटनेचा निषेध करत गायकवाड म्हणाले, भारतीय संविधानाने देशात एकात्मतेचा संदेश दिला आहे. असे असताना संविधानाच्या प्रती जाळणे ही निंदनीय व देशाला उध्दवस्त करणाऱ्याचा प्रयत्न म्हणून या घटनेकडे पहावे लागेल. प्रती जाळणाऱ्यांना देशात पुन्हा एकदा वर्णव्यवस्था निर्माण करायची आहे की पुन्हा एकदा मनुस्मृतीवर आधारित देश चालवयचा आहे हा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. संविधानाने देशाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविला आहे. त्याबाबत जर कोणी गैरकृत्य करणार असेल तर संविधान के सन्मान मे, सब भीमसैनिक मैदान मे गर्जना करून सोमवारी सर्वपक्षीय आंदोलन केले जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

चंद्रकांत खंडाईत म्हणाले, जेएनयु विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जात असेल तर आता संविधान जाळणाऱ्यांवर देखील देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तसेच आम्ही मनुस्मृतीचे एक पान जाळले तर आमच्यावर तात्काळ गुन्हे दाखल केले जातात असे असताना दिल्ली येथे संविधान जाळे पर्यंत पोलीस काय करत होते असा प्रश्‍न उपस्थित होत असून संबधित पोलीस अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल केले गेले पाहिजेत. सरकारने जर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत तर सरकारच अशा घटनांना पाठींबा आहे हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पाऊले उचलून कारवाई करावी अशी मागणी खंडाईत यांनी केली. दादासाहेब ओव्हाळ म्हणाले, संविधान आमच्यासाठी प्राण आहे. त्यासोबत जर कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार असेल तर जशास तसे उत्तर देण्यास कमी पडणार नाही. तर शरद गायकवाड म्हणाले, देशातील 130 कोटी लोकसंख्येसाठी संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे संविधानाचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक जाती व धर्मातील लोकांनी रस्त्यावर उतरण्याची आवश्‍यकता आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)