सरकारची अकार्यक्षमता चव्हाट्यावर -सचिन सावंत

शेतकऱ्यांना उचल देण्याची योजना अपयशी

मुंबई- राज्यातील शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी 10 हजार रुपये उचल देण्याची सरकारची योजना पूर्णपणे अपयशी ठरली असून सरकारची अकार्यक्षमता चव्हाट्यावर आली आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

मागील आठवडा संपेपर्यंत राज्यात केवळ 2200 शेतकऱ्यांना 10 हजार रुपये उचल योजनेचा लाभ मिळाला आहे. यातील 1153 शेतकऱ्यांना विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेने उचल दिली असून केवळ 4 जिल्हा सहकारी बॅंकांनी शेतकऱ्यांना उचल दिली आहे. अजुनही राज्यातील इतर जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी 10 हजार रुपये उचल देण्यासंदर्भात अनास्थाच दाखवली असून राष्ट्रीयकृत आणि खासगी बॅंकांनी देखील ही उचल वाटपास सुरुवात केली नाही.

राज्य सरकारने 11 जून रोजी शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी 10 हजार रुपये उचल तात्काळ देण्याची घोषणा केली होती. परंतु बॅंकांना हमी देण्यासाठी राज्य सरकारने 4 जुलैपर्यंत म्हणजेच जवळपास 25 दिवसांचा वेळ लावला. या हमीनंतर राष्ट्रीयकृत बॅंकांना संचालक मंडळात नव्याने ठराव मंजूर करून बॅंकांच्या शाखांना सदर आदेश पाठवण्याची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. सरकारच्या वेळकाढूपणामुळे आणि दफ्तर दिरंगाईमुळे सदर योजना सपशेल अपयशी ठरली आहे, असे सावंत म्हणाले.

आज राज्यभरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. परंतु सरकारकडून अद्याप कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळत नाही. परंतु खोट्या आकडेवारीसहीत कर्जमाफीच्या संदर्भात सरकार राज्यातील शेतकऱ्यांची सातत्याने दिशाभूल करत आहे.
कर्जमाफी पोकळ घोषणा
राज्यातील शेतकरी संकटात असताना सरकारने फक्त कर्जमाफीच्या पोकळ घोषणा केल्या. अद्याप राज्यातील एकाही शेतकऱ्याचे कर्ज माफ होऊन त्याला नवीन कर्ज मिळालेले नाही. 10 हजारांची उचलही बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी सरकारने मोफत बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावीत. तसेच तात्काळ उचल म्हणून देण्यात येणाऱ्या 10 हजार रुपयांच्या रकमेत वाढ करावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)