समृद्ध जैवविविधता लाभलेला श्रीगोंदा (भाग दोन )

जैवविविधतेने नटलेला एक समृद्ध तालुका म्हणून श्रीगोंद्याची नवी ओळख सर्वदूर होऊ लागली आहे. मुळात अनेक वर्षांपासून या तालुक्‍यात अशी नैसर्गिक संपदा होती. मात्र, त्याची शास्त्रीय नोंदणी व माहितीचा प्रसार झाला नव्हता. 

मनाला सतत चटका लागतो तो म्हणजे कांड्या करकोचा (डोमेझेल क्रेन) या पक्ष्यांनी तालुक्‍याकडे फिरवलेली पाठ.
पूर्वी हे पक्षी खूप मोठ्या संख्येने तालुक्‍यात सर्वदूर थव्यांनी दिसून यायचे. आकाशात इंग्रजी व्ही अद्याक्षराप्रमाणे उडणाऱ्या बलाकमाला डोळ्यांचे पारणे फेडीत. या पक्ष्यांचे आवडते खाद्य करडई होते. आता करडीचे पीक कोणी घेत नाही. या पक्ष्यांनी तालुक्‍याला केलेला गुडबाय खरोखर चिंतेचा व संशोधनाचा विषय आहे.

तलावावर हिवाळ्यात स्थलांतर करून येणाऱ्या बदकांप्रमाणेच वंचक, चक्रांग, स्पॉटबील, तिरंदाज, थापट्या, शेकाट्या, मुग्धबलाक, तलवार बदक, पाणडूबी यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. जमिनीवर व झाडांवर वावरणाऱ्या पक्ष्यांमध्ये बुलबुल, विविध प्रकारची मैना, हुदहुद, चातक, सोनपाठी सुतार, शिंजिर, वेडाराघू, राखी खाटीक, टकाचोर, धनेश, चष्मेवाला, सुगरण, शिंपी, नाचरा, तांबट, हळद्या, पावशा, हरियल, युवराज, पिंगळा, निळकंठ, तारवाली, शिक्रा, तिसा, शाही ससाणा, घार, सातभाई, डोंबारी, शंकर, धोबी, लावा, दयाळ, कोतवाल, साळुंकी, धावीक, होला, घुबड, मोर, पारवा, तितर, टिटवी, सुभग, माळटिटवी, आदी पक्ष्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

श्रीगोंदा तालुक्‍याच्या जैविक समृद्धीत पशु-पक्ष्यांनी भर घातली आहे. त्यांच्या अस्तित्वामुळे श्रीगोंदा तालुक्‍याची नवी ओळख सर्वदूर पसरली आहे. विविधतेने नटलेली ही नैसर्गिक परंपरा तालुक्‍याचे भूषण आहे. निसर्ग व पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी तसेच मानवी जीवन सुखकर व आनंदी होण्यासाठी हे सर्व वैभव जपले पाहिजे. शेवटी “जगा व जगू द्या’ या न्यायानेच आपल्याला चालावे लागेल.

डॉ. ज्ञानदेव म्हस्के

प्राचार्य, श्रीगोंदा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)