समृद्ध जैवविविधता लाभलेला श्रीगोंदा (भाग एक)

जैवविविधतेने नटलेला एक समृद्ध तालुका म्हणून श्रीगोंद्याची नवी ओळख सर्वदूर होऊ लागली आहे. मुळात अनेक वर्षांपासून या तालुक्‍यात अशी नैसर्गिक संपदा होती. मात्र, त्याची शास्त्रीय नोंदणी व माहितीचा प्रसार झाला नव्हता.

तालुक्‍यातील माझ्यासोबत काही पक्षीमित्रांनी सुमारे 20 वर्षांपासून वन्यजीव विविधतेची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले अन्‌ पाहता पाहता तालुक्‍याची ही नवी ओळख सर्वदूर पोहोचली. 1979 साली राज्य सरकारने श्रीगोंदा, कर्जत व करमाळ्यासह फार मोठ्या क्षेत्रावर माळढोक पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले. पुढे त्याचा शेतकऱ्यांना झालेला जाच व औद्योगिक विकासाला बसलेला ब्रेक यामुळे हे अभयारण्य वादग्रस्त व लोकांच्या रोषाचे कारण ठरले.

एखाद्या चांगल्या उपक्रमाच्या केलेली अप्रस्तुत अंमलबजावणीमुळे काय विपरीत घडते याचे हे एक दुष्ट उदाहरण ठरावे. असो. या निर्णयामुळे माळढोकचे तर भले झाले नाही, उलट जनतेच्या रोषामुळे माळढोकच्या संरक्षण व संवर्धनात अडथळे आले. एकेकाळी खूप मोठ्या संख्येने असलेल्या या पक्ष्यांचे अस्तित्व आता फक्त नान्नज (सोलापूर)  अभयारण्यापुरतेच तेही बोटावर मोजण्याइतकेच उरले आहे. हा देखणा पक्षी व माळावरील राजा काही वर्षात फक्त चित्रातच पहायला मिळतो की काय याची भीती वाटते.

माळढोकसह तालुक्‍यात काळवीट अभयारण्य देखील खूप विस्तृत आहे. खूप मोठ्या प्रमाणात काळविटांचे कळप तालुक्‍यात सर्वदूर पहायला मिळतात. शेजारील रेहकुरी अभयारण्य तर राज्यात सर्वपरिचित आहे. हरिणांशिवाय चिंकारादेखील तालुक्‍यात आढळतो. अलीकडे बिबट्याचे अस्तित्व दिसू लागले आहे. सुरोडी येथे 20 वर्षांपूर्वी सर्वप्रथम बिबट्या मृत अवस्थेत आढळला होता. नंतर कोथूळ, कोसेगव्हाण, ढोरजे, वडाळी, वडगाव शिंदोडी, माठ, म्हसे, बेलवंडी, काष्टीचा परिसर, आदी भागात बिबट्याचे अस्तित्व आढळले. ऊस शेतीमुळे बिबट्याला लपून बसायला मोठी दडण आहे. खाद्य, पाणी व दडण यामुळे बिबट्याला तालुक्‍यात खूप पोषक वातावरण आहे. सामान्यांच्या दृष्टीने बिबट्याचे स्थिरावणे चिंतेचे कारण ठरत आहे.

वन्यजीवांमध्ये खोकड, माकड, कोल्हे, लांडगे, खवल्यामांजर, ताडमांजर, उदमांजर, घोरपड, तरस, साळिंदर, आदी प्राणी जागोजागी आढळतात. तृणभक्षी प्राण्यांमध्ये सशांचे अस्तित्व खूप मोठ्या प्रमाणात आहे. रानडुकरांची तर पूर्वापार चलती आहे. सापांमध्ये सर्वाधिक संख्येने येथे घोणस हा साप आढळतो. मण्यार, नाग यासह अलीकडे कोकणातून कुकडीच्या पाण्याद्वारे आलेला विषारी फुरसादेखील आपले अस्तित्व टिकवून आहे.

तालुक्‍यात पाणपक्षी खूप मोठ्या संख्येने आढळतात. पानकावळा (कार्मोरंट) या पक्ष्यांची तर हजारोंची संख्या असलेले थवे तलाव व नदीकाठी पहायला मिळतात. तालुक्‍याला राष्ट्रीय स्तरावर जैव समृद्धीची ओळख मिळवून देणारा ग्रे-हेरॉन किंवा राखी बगळा यांच्या असंख्य वसाहती तालुक्‍यात आढळल्या आहेत. भीमा नदीच्या काठावर दुतर्फा शेकडो झाडांवर या पक्ष्याचे सारंगागार (हेरॉनरी) आम्ही पक्षीमित्रांनी हुडकून काढल्या. त्याचसोबत अतिशय देखणा रंगसंगतीने लक्ष वेधून घेणारा चित्रबलाक (पेंटेडस्टोर्क) या पक्ष्याच्या देखील अनेक वसाहती श्रीगोंदा तालुक्‍यात नुकत्याच सापडल्या आहेत. दर्विमुख (स्पूनबील) किंवा चमचा या पक्ष्यांची नवीन कॉलनी आम्ही गतवर्षी शोधून काढली.

स्थलांतर करून येणारा रोहित (फ्लेमिंगो) हा पक्षी तर तालुक्‍याचे मुख्य आकर्षण ठरावे. नदीकाठासह विविध तलावात याचे थवे मागील काही वर्षांत पहायला मिळाले आहेत. उत्तरेतून स्थलांतर करून हिवाळ्यात आपल्याकडे येणारे भोरड्यांचे (रोझीपास्टर) थवे यावर्षी खूपच मोठ्या संख्येने पहायला मिळाले.

डॉ. ज्ञानदेव म्हस्के

प्राचार्य, श्रीगोंदा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)