समृद्धी महामार्गाविरोधात शहापूर शेतकऱ्यांचे 20 जुलैला जेलभरो

शहापूर – भाजप आणि शिवसेनेकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाबाबत शेतकऱ्यांकडून जबदस्तीने जमिनी घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शहापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी रविवारी केला. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागून महामार्गाचे काम होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शहापूर शेतकऱ्यांनी घेतला आहे. जमिनी खरेदीला सुरूवात झाल्याचे आणि त्यासाठी ठाण्यात कार्यक्रम झाल्याचे समजताच संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गाविरोधात तातडीची बैठक घेतली आणि 20 जुलैला जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला. या जेलभरो आंदोलनाला शहापुरातून सुरूवात करण्यात येईल, असे जाहीर करतानाच या आंदोलनाच्या नेत्यांनी भूमिका बदलणारे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि रस्ते विकास महामंडळाविरोधात निषेधाचा ठरावही मंजूर केला.

या बैठकीत समृद्धी महामार्गाला असलेल्या ठाम विरोधाचा पुनरूच्चार करण्यात आला. शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर संताप व्यक्त करण्यात आला आणि पॅकेजऐवजी वाटाघाटी पद्धतीने सुरू असलेल्या जमीन खरेदीच्या सरकारच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या संदर्भात संघर्ष समितीचे नेते बबन हरणे म्हणाले, सरकार शेतकऱ्यांशी संवाद साधत नाही. ज्यांच्या जमिनी जातात, त्यांना विश्वासात घेत नाही, रेडिरेकनरचे दर काय आहेत, नेमका कसा आणि किती मोबदला देणार , पॅकेज काय याची माहिती न देता दडपशाही सुरू आहे. उलट नेत्यांबद्दल, आंदोलक शेतकऱ्यांबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम सुरू आहे. या बैठकीस शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायक पवार, नेते बबन हरणे, गणेश अधिकारी, रामुशेठ अंदाडे, हरिभाऊ खाडे, आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)