समितींच्या निवडीत “तीर्थक्षेत्र’ची बाजी

“तेलही गेले अन्‌ तुप ही…’ अशी महाविकास आघाडीची गत

वाई – वाई पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीमध्ये विरोधकांची आघाडी नोंदणीकृत नसल्याचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात वाई महाविकास आघाडी आज तोंडघशी पडली. तीन समित्यांवर केवळ दोन सदस्यांच्या निवडी पलिकडे पदरी काहीच न पडल्याने “तेल ही गेले आणि तूपही…’ अशी गत महाविकास आघाडीची झाली. पाच समित्यांपैकी केवळ तीन समित्यामध्ये दोन सदस्यांच्या निवडी झाल्या. मात्र, सभापतींची निवड न झाल्याने एकही समिती होवू शकली नाही. समिती सभापतींच्या निवडी न झाल्याने स्थायी समितीही गठित झाली नाही. त्यामुळे सर्व आर्थिक अधिकार सर्वसाधारण सभेस मिळाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाई नगरपरिषदेची विषय समिती सदस्य व सभापती निवडीची विशेष सभा पिठासन अधिकारी तथा तहसिलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांना मुख्याधिकारी सौ. विद्या पोळ यांनी सहकार्य केले. सभेच्या सुरूवातीसच वाई विकास आघाडीचे नगरसेवक महेंद्र धनवे यांनी विषय समितीच्या सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्र कोणास दाखल करता येते याच्या नियमांची माहिती देण्याची विनंती तहसिलदारांना केली. सभेच्या प्रारंभीच नियमावर बोट ठेवल्याने शेंडगे यांनी नोंदणीकृत आघाडीच्या सदस्यांना नामनिर्देशन दाखल करता येईल, असे स्पष्ट केले व नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सांगितले.

त्यानुसार पाच समित्यांपैकी शिक्षण समिती, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती व स्वच्छता विषयक वैद्यकिय व आरोग्य समितीसाठी विकास आघाडीच्यावतीने प्रत्येकी तीन नामनिर्देशनपत्र गटनेते सतीश वैराट यांनी दाखल केली. तर अपक्षांच्यावतीने पाच समितीसाठी तीन सदस्यांनी नामनिर्देशपत्र दाखल केले होते.

पिठासन अधिकारी यांनी पालिका अधिनियम कलम 63/2 ब नुसार नोंदणीकृत आघाडी, गट किंवा फ्रंट यांच्या तौलनिक संख्याबळाचा विचार करून छाननी अंती वाई विकास आघाडीचे 7 सदस्य असल्याने तीन समित्यांसाठी प्रत्येकी केवळ दोनच अर्ज ग्राह्य धरले. तर प्रत्येक समितीतील एक अर्ज अग्राह्य झाला. अपक्षांनी केलेले सर्व नामनिर्देशन अर्ज फेटाळण्यात आले. यामुळे बांधकाम व महिला बालकल्याण समितीच गठित झाल्या नाहीत.

यावेळी शिक्षण समितीच्या सदस्यपदी सौ. सुनिता तुषार चक्के व महेंद्र बापू धनवे, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सदस्यपदी सौ. सुमैया अमजद इनामदार व महेंद्र बापू धनवे तर स्वच्छता विषयक वैद्यकीय व आरोग्य समिती सदस्यपदी सौ. रुपाली अमित वनारसे व सौ. वासंती विजय ढेकाणे यांची निवड झाली. उर्वरीत सदस्यपदे रिक्त राहिली. या तीन समित्यांमध्ये केवळ दोनच सदस्य नियुक्त झाल्याने सभापतीपदासाठी सूचक, अनुमोदन न मिळाल्याने सभापतीपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल होवू शकले नाही. कोणत्याच समितीचे सभापती नियुक्त न झाल्याने स्थायी समिती गठित होवू शकली नाही.

नगरसेवकांमध्ये परस्पर सामंजस्य नसल्याने व एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात पालिकेच्या इतिहासात प्रथमच विषय समित्यांची वासलात लागली. यामुळे एका वर्षासाठी समित्या गठित न झाल्याने पालिकेतील सर्व आर्थिक व्यवहार सर्वसाधारण सभेत मंजूरीसाठी जाणार आहेत. पालिकेत वाई विकास आघाडीचे अध्यक्षांसह 7 तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे स्विकृत सदस्यांसह 16 असे संख्याबल आहे. तीर्थक्षेत्र आघाडीचे संख्याबल अधिक असले तरी निवडणुकीनंतर एक महिन्याच्या आत आघाडी नोंदणीकृत न केल्याने सर्व नगरसेवकांना अपक्ष गणण्यात येते. त्यामुळे सर्वसाधारण सभेत अपक्षांचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांचे पारडे जड राहणार आहे.

दरम्यान वाई विकास आघाडीच्यावतीने प्रशासनाकडे विषय समित्यांच्या निवडी नियमानुसार करण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाव्दारे केली होती. त्यानुसार पिठासन अधिकाऱ्यांनी नियमांचा आधार घेवून निर्णय घेतल्याने वाई विकास आघाडीची खेळी त्यांच्याच अंगलट आली. नगरसेवकांच्या या कलगीतुऱ्याच्या भांडणाचे पडसाद मात्र शहराच्या विकासावर उमटण्याची चिन्हे आहेत.

सभेस नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, भारत खामकर, चरण गायकवाड, राजेश गुरव, संग्राम पवार, ऍड. श्रीकांत चव्हाण, दीपक ओसवाल, बाळासाहेब बागुल, विकास काटेकर, महेंद्र धनवे, सतीश वैराट, सौ. सिमा नायकवडी, सौ. रेश्‍मा जायगुडे, सौ. स्मिता हगीर, सौ. प्रियांका डोंगरे, सौ. सुमैय्या इनामदार, सौ. शितल शिंदे, सौ. वासंती ढेकाणे, सौ. सुनिता चक्के आदी उपस्थित होते. याकामी महसुल विभागाचे मनोज आगरकर, सभाअधिक्षक राजेंद्र जाधव, लेखाअधिक्षक नितीन नायकवडी, पाणी पुरवठा प्रमुख चंद्रकांत गुजर यांनी सहकार्य केले.

अपक्ष नगरसेवकांचा हक्कच नाकारण्यात आल्याने कथीत तीर्थक्षेत्र विकास आघाडी हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. तर विषय समितीच्या निवडीत दोनच अर्ज ग्राह्य धरून तीसरा अर्ज अग्राह्य धरल्याने वाई विकास आघाडी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)