समान पाणी योजनेच्या खोदाईस मान्यता

106 किलो मीटरची खोदाई होणार सुरू


निवडणुकीत फटका बसण्याच्या भीतीने खोदाईस टाळाटाळ


1,800 किलो मीटर रस्त्यांची होणार खोदाई

पुणे – तब्बल 2,500 कोटी रुपये खर्चून पुणेकरांना चोवीस तास पाणी देण्यासाठी महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेच्या खोदाईस अखेर मुर्हूत सापडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेसाठीच्या रस्ते खोदाईमुळे पुणेकरांना त्रास झाल्यास त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची भीती व्यक्त करत या खोदाईस मान्यता दिली जात नव्हती. मात्र, अखेर महापालिका आयुक्तांनी त्यास मान्यता दिलेली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

शहरात चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्‍यांच्या कामांना दोन वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. शहरात 82 ठिकाणी टाक्‍या उभारण्यात येणार असून त्यापैकी आठ टाक्‍यांचे काम पूर्णही झाले आहे. याशिवाय, या कामासाठी शहरातील एकूण 2,100 किलो मीटरपैकी जवळपास 1,800 किलो मीटर रस्त्यांची खोदाई केली जाणार आहे. ही सर्व खोदाई जलवाहिनी टाकण्यासाठीची आहे. त्यामुळे टाक्‍यांचे काम सुरू झाल्यानंतर आता या खोदाईचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी हे काम देण्यात आलेल्या कंपनीने मोठ्या जलवाहिन्यांसाठी सुमारे 108 किलो मीटर, तर सुमारे 250 किलो मीटरच्या जोड जलवाहिन्यांसाठी खोदाईचा आराखडा सादर केला आहे. मात्र, त्यास मान्यता देण्यास महापालिका प्रशासन तयार नव्हते. तसेच पक्षनेत्यांनी अजून खोदाई धोरण मंजूर केलेले नसल्याने प्रशासनाने मान्यता दिल्यास अडचण नको, म्हणून पक्षनेत्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली. त्यात “खोदाईमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, तसेच रस्ते बंद करावे लागणार नाहीत अशा पद्धतीने निर्णय घ्या,’ असे सांगत हा खोदाईचा चेंडू पुन्हा प्रशासनाकडे टोलविण्यात आला होता. मात्र, या खोदाईस विलंब झाल्यास या योजनेचे काम रखडण्याची भीती असल्याने अखेर महापालिका आयुक्तांनी निर्णय घेत या 106 किलो मीटरच्या खोदाईस मान्यता दिली असल्याचे पथ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)