समान पाणीपुरवठा योजनेच्या कर्जावर शिक्कामोर्तब

7.59 टक्के व्याजदराने 200 कोटी रुपयांच्या कर्जावर शिक्कामोर्तब, मंगळवारी महापालिकेच्या तिजोरीत पैसे जमा होणार

पुणे – समान पाणीपुरवठा योजनेसाठी (24 बाय 7) कर्जरोख्यांचा मार्ग मोकळा झाला असून, मुंबई शेअर बाजारात 7.59 व्याजदराने दोनशे कोटी रुपये एका दिवसातच महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहेत. मंगळवारपर्यंत ही रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महापालिकेने आणलेल्या 200 कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांवर सोमवारी दुपारी मुंबई शेअर बाजारात बोली झाली. त्यामध्ये या कर्जरोख्यांची सहापटीने मागणी नोंदवण्यात आली. त्या कर्जरोख्यांमध्ये सुमारे 21 गुंतवणूकदारांनी स्वारस्य दाखवले. यामध्ये काही बॅंका, इन्शुरन्स कंपन्या आणि पेन्शन फंड कंपन्या असल्याचे कुणाल कुमार यांनी सांगितले. या ऑनलाइन बोलीमध्ये 7.59 टक्के असा सर्वात कमी व्याजदर आकारणाऱ्या वित्तीय संस्थांनी हे कर्जरोखे घेतले असून, हे कर्ज पुढील दहावर्षांसाठी घेण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 2264 कोटी रुपयांच्या समान पाणीपुरवठा योजनेला अखेर मुहूर्त मिळाला असून, 200 कोटी रुपयांच्या महापालिका प्रशासनाने बाजारात आणलेल्या कर्जरोख्यांना गुंतवणूक दारांनी प्रतिसाद दिला आहे. 2264 कोटी रुपयांचे कर्जरोखे महापालिका पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने बाजारात आणणार आहे. त्यातील पहिला 200 कोटी रुपयांचे कर्जरोख्यांचा टप्पा महापालिकेने पूर्ण केला आहे.

महापालिकेने बोलीसाठी आणलेल्या कर्जरोख्यांना गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद देत सहा पट जादा म्हणजे 1200 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. या ऑनलाईन बोलीमध्ये सर्वांत कमी व्याजदर आकारणाऱ्या वित्तीय संस्थेने हे कर्जरोखे घेतले आहेत, अशी माहिती कुणाल कुमार यांनी दिली.

पुणे शहरासाठी 24 तास समान पाणीपुरवठा करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने एक महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी 2264 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून ही रक्कम कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभी करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासासाठी कर्जरोखे उभारणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. देशातील इतर महानगरपालिकांसाठी ही एक महत्वाची घटना ठरणार आहे. देशभरात कर्जरोख्यांचा व्यापाराचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याचा निर्णय धोरणकर्त्यांनी घेतल्याचे चित्र आहे. पुणे महानगरपालिका आपल्या अनुभवाच्या जोरावर या प्रक्रियेचा अहवाल तयार करणार असून तो इतर महामहापालिकांना “केसस्टडी’ म्हणून अभ्यासता येईल, असे कुणाल कुमार यांनी सांगितले.

मंगळवारी पैसे जमा होण्याची शक्‍यता
महापालिकेच्या कर्जरोख्यांचा व्याजदर 7.59 टक्‍क्‍यांवर स्थिर झाला असल्याने, मंगळवारीच गुंतवणूक दारांचे पैसे महापालिकेच्या तिजोरीत जमा होतील. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या पुढील कामांना सुरूवात होणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.
यामध्ये कोणत्या गुंतवणूकदारांनी स्वारस्य दाखवले आहे

22 जूनला “बॉण्ड लिफ्टिंग’
मुंबई शेअर बाजारात 22 जूनला कर्जरोख्यांची नोंदणी करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेकडून स्थानिक प्रकल्पासाठी कर्जरोखे उभारण्यात येत आहेत. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जरोखे उभारणारी पहिली महापालिका ठरण्याचा मान पुण्याला मिळाला आहे. देशपातळीवर हे मॉडेल ठरणार असल्याने राज्य तसेच केंद्र सरकारकडून सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. “बॉण्ड लिफ्टिंग’ करण्याच्या कार्यक्रमात गुंतवणूकदारांची नावे आणि माहिती कळेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी केले अभिनंदनाचे ट्विट
शेअर्स बाजारातून उभारण्यात आलेली ही रक्कम मंगळवारी पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. गेल्या 14 वर्षांत पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अशा प्रकारे निधी उभारण्यात आले असून ही एक ऐतिहासिक घटना असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. विकासाची ही नवी सुरूवात झाल्याचेही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)