‘समाजाला अस्थैर्याकडे ढकलताहेत’

डॉ. श्रीपाल सबनीस : संविधान जागर सप्ताहाचे उद्‌घाटन

पुणे – सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी शाहू-फुले-आंबेडकर ही विचारसरणी आतापर्यंत राज्यात कार्यरत होती. मात्र, राजकीय स्वार्थासाठी आरक्षण मुद्याद्वारे या विचारसरणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न शासनकर्त्यांकडून केला जात आहे. मराठा आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करून, समाजाला अस्थैर्याकडे ढकलण्याचे काम सत्ताधारी करत आहेत, अशा शब्दांत माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मराठा आरक्षणाच्या चर्चेबाबत नाराजी व्यक्‍त केली आहे.

भारतीय संविधान संवर्धन समितीतर्फे भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान जागर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या उद्‌घाटन बुधवारी आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अर्जुन डांगळे यांच्या हस्ते संविधान रत्न पुरस्कार वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सबनीस यांनी भूषविले. यावेळी नगरसेविका लता राजगुरू, नगरसेवक रवींद्र माळवदकर, सदानंद शेट्टी, संयोजक विठ्ठल गायकवाड उपस्थित होते.

डॉ. सबनीस म्हणाले, सर्व जातीचे महासंघ हे संविधानविरोधी आहेत. राजकीय वर्चस्व टिकविण्यासाठी आरक्षणाच्या मुद्‌द्‌याचा गैरवापर केला जात आहे. हे संविधानासमोरील एक मोठे संकट आहे. अत्यंत कडवा हिरवा अथवा कडवा भगवा रंग देशाला परवडणारा नाही. तर, सर्वांना सन्मानाने वागविणारा निळा रंगाचे प्रतिनिधित्व या देशाला आवश्‍यक आहे. त्यासाठी शहरातील सर्व आंबेडकरवादी गटांना एकत्रित करण्याचे महत्त्वाचे काम या समितीच्या माध्यमातून घडतेय ही अभिमानाची बाब आहे.

महातेकर म्हणाले, बाबासाहेब हे केवळ एखाद्या समाजापुरतेच मर्यादित नव्हते तर, ते संपूर्ण भारताचे नेते होते. बाबासाहेबांनी सर्वसमावेशक विचारांतून घटनेची रचना केली आहे. त्यामुळेच या घटनेच्या संदर्भात सर्व भारतीयांमध्ये आदर निर्माण झाला पाहिजे. तो जाणीवपूर्व व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. अस्पृश्‍य समाजाला आपण मान्य केले नसते तर, त्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार यांच्या सुविधा उपलब्ध झाली नसती. तसेच आज गावागावात भीषण संघर्ष उभारला असता. आपली अवस्था टांझानियासारखी झाली असती. मात्र, सवलती देताना, वंचित घटकांनी स्वत:चा विकास साधत स्वत:चे राहणीमान उंचावले पाहिजे आणि लवकरात लवकर आरक्षणाच्या जोखडीतून मुक्‍त व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. बाबासाहेबांनी दलितांसाठी, वंचितासाठी वेगळा प्रदेश मागितला नाही. तर, याच देशात राहून स्वत:चा विकास साध्य करण्याचा त्यांचा निर्धार होता. यादृष्टीनेच आपण हे कार्य केले पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)