समाजात बेडरपणा वाढला – कुलकर्णी

राजगुरुनगर -आजकाल कोणीही पैशाची, कलेची किंवा राजकारणातील ताकदीची टिमकी वाजवीत असून समाजात बेडरपणा, निर्लज्जपणा अथवा पैशांची धुंदी वाढत चालली आहे. मात्र, माणसाच्या मेंदूमधील एक छोटीशी रक्तवाहिनी तुमचं बोलणे चालू ठेवायचे की बंद करायचे हे ठरवू शकते. या पार्श्‍वभूमीवर माणसाने माणुसकी धर्म पाळला नाही तर माणसाची माय असलेली माती जेव्हा हिशोबाला बसते तेंव्हा कोणालाच सोडत नाही अशी भावना सुप्रसिद्ध संगीतकार, गायक, लेखक डॉ सलील कुलकर्णी मांडली.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत “कवितेचे गाणे होतांना’ या विषयावर कुलकर्णी बोलत होते. यावेळी डॉ. सलील कुलकर्णी यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ संजय शिंदे यांनी संवाद साधला.
डॉ. सलील कुलकर्णी यांनी कुसुमाग्रजांच्या मातीची दर्पोक्ती या कवितेचे उदाहरण देताना “अभिमानी मानव आम्हाला अवमानी, बेहोष पाऊले पडती आमच्यावरुनी, त्या मत्त पदांना नच जाणीव अजुनी, की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती, मातीवर चढणे एक नवा थर अंती’ या ओळी सादर केल्या. कवितेबद्दल बोलताना कविता ही अस्वस्थतेतून जन्माला येते असे सांगून दर्द असल्याशिवाय सूर लागत नाही असे त्यांनी नमूद केले. आताच्या मोबाईल आणि संगणकाच्या युगात मुलांचे बालपण अडकले असून मुलांना संस्कार शिबिरात टाकण्यापेक्षा त्यांना वेळ व प्रेम देण्याची गरज आहे. त्यासाठी संस्कार करणारे आजी-आजोबा घरी असावे लागतात असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात त्यांनी उच्चरणातील आनंद, मनाला उल्हास व प्रसन्नतेचा भाव देणारी “अग्गबाई डग्गुबाई’ या अल्बममधील बालगीते तसेच हे गजवदन, येई गा विठ्ठला, क्षण अमृताचे, आयुष्यावर बोलू काही या अल्बममधील गीते सादर केली. गीतकार सुधीर मोघे कवयित्री शांताबाई शेळके, कवी विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, ग्रेस या कवींच्या कवितांचे वेगवेगळे पदर, त्यातील सौदर्यस्थळ उलगडून दाखविली. पं. हृदयनाथ मंगेशकर यांना कविता चांगली समजते असे सांगून त्यांच्याबरोबरब केलेला मैत्र जीवांचे या कार्यक्रमाच्या आठवणी सांगितल्या व त्यांची लोकप्रिय गीतेही सादर केली.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)