समाजातील उपेक्षितांना यशोधन हक्काचा निवारा

वेळे ः यशोधन ट्रस्टच्या भूमिपूजनप्रसंगी श्रीफळ वाढवून उद्‌घाटन करताना आ. मकरंद पाटील शेजारी उपस्थित मान्यवर.

निवारा केंद्राचे भूमिपूजन समारंभात आ. मकरंद पाटील यांचे प्रतिपादन
वाई, दि. 19 (प्रतिनिधी) – रस्त्यावर ऊन, वारा, पावसात हालअपेष्टा सोसत फिरणाऱ्या बेघर मनोरुग्णांना ताब्यात घेवून त्यांच्यावर उपचार करून माणूस म्हणून पुन्हा समाजात उभे करण्याचे पवित्र काम यशोधन ट्रस्टच्या माध्यमातून रवींद्र बोडके व सौ. सोनाली बोडके करीत आहेत. त्यांचे हे कार्य समाजासाठी आदर्शवत आहे. समाजातील उपेक्षितांना यशोधन ट्रस्ट संचालित निवारा केंद्र हक्काचा आहे, असे प्रतिपादन वाई तालुक्‍याचे आमदार मकरंद पाटील यांनी यशोधन ट्रस्टच्या वेळे (ता. वाई) येथील नवीन वास्तूचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना केले.
यशोधन ट्रस्टच्या माध्यमातून सातारा येथे मनोरुग्णांवर उपचार करण्यात येतात. परंतु, त्या ठिकाणी काही उपचार करण्यासाठी मर्यादा पडत असल्याने यशोधन ट्रस्टने वेळे येथे प्रशस्त जागेत चांगल्या पद्धतीने उपचार करता यावेत, यासाठी नवीन वास्तूची उभारणी करण्याचा मानस असून त्या अनुषंगाने भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दिलीपबाबा पिसाळ, माजी उपसभापती मदन भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अशोकराव सरकाळे, जनता अर्बन बॅंकेचे माजी अध्यक्ष सुरेशराव कोरडे, माजी सभापती वामनराव जमदाडे, वेळेगावंचे सरपंच रफिक इनामदार, पत्रकार सुजित आंबेकर, सौ. अमिता आंबेकर, सौ. अनुश्री भिडे, डॉ. मयंक शेलार, डॉ. विजयाताई शेलार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, शहर सरचिटणीस विजय ढेकाणे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब चव्हाण, प्रतापराव लोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. मकरंद पाटील म्हणाले, बाहेरून आणून महामार्गावर सोडलेले मनोरुग्ण फिरताना दिसतात. त्यांना आपले नाव, गाव सांगता येत नाही. निराधार व बेघर असल्याने ते रात्री उघड्यावर झोपून भिक मागून आपले जीवन जगतात. त्यांचे घाणेरडे राहणीमान व विचित्र हावभाव पाहून रस्त्याने येणारे-जाणारे लोक त्यांच्याकडे पाहतात. त्यातील काहीजण त्यांना मदत करतात तर काहीजण त्यांची टिंगल टवाळी करतात. अशा मनोरुग्णांचा शोध घेऊन त्यांना सातारा येथील शासकीय मनोरुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम गेल्या चार वर्षांपासून करीत आहेत. यशोधन ट्रस्टचे संस्थापक रवी बोडके, सौ. सोनाली बोडके त्यावर सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून सातारा जिल्ह्यातील सर्वच शहरात ही मोहीम राबवितात. शांत व मन प्रसन्न ठेवणाऱ्या वेळे येथील जागेत हे उपेक्षितांसाठी हे हक्काचा निवारा केंद्र चालू करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना सहकार्य करावे, असेही आमदार म्हणाले. सुरुवातील आमदार मकरंद पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. प्रास्ताविक रवींद्र बोडके यांनी तर आभार व सूत्रसंचालन संदीप प्रभाळे यांनी केले. यावेळी वेळे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुग्णांवर 10 तारखेपर्यंत उपचार करावेत
जिल्हा न्यायदंडाधिकारी वावरे यांच्यासमोर या रुग्णांना हजर केले असता त्यांच्यावर 10 तारखेपर्यंत जिल्हा रुग्णालयात उपचार करावेत आणि त्यानंतर अहवाल सादर करावा असा आदेश दिला गेला. दरम्यान मनोरुग्णांना पुण्याच्या शासकीय मनोरुग्णालयात अथवा आश्रमात दाखल करण्यात येणार असल्याचे योगेश मालखरे यांनी सांगितले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)