समाजाच्या मूलभूत प्रश्नावर काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हेच कर्तव्य

वाघापूर- आपल्या पूर्वजांनी तलवारीच्या जोरावर इतिहास घडविला आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत आपण हे विसरलो आहोत, त्यामुळे एक प्रकारे इतिहास विसरून त्याला फाटा आपण देत चाललो आहोत, हे दुर्दैवी आहे. समाजाला अभिप्रेत असलेला राज्यकारभार चालविणे, समाजाला न्याय देणे, मूलभूत प्रश्नांवर काम करणे हे छत्रपती संभाजी महाराजांना अभिप्रेत होते आणि हेच काम समाजातील काही व्यक्ती आवर्जून करीत आहेत. म्हणून स्वतःचा स्वार्थ विसरून जनतेची कामे करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी केले आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनामध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना राजेंद्र कोंढरे यांनी चांगल्या गोष्टी करताना अनेक वेळा समाजाचा विरोध होतो; परंतु तो पत्करून सामाजिक कामे करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे असे सांगितले. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस गुलाबराव गायकवाड, माजी नगरसेवक यशवंत जगताप, महिला आघाडी प्रमुख शोभा पाचंगे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगताप, जिल्हा सचिव राकेश काळभोर, अंकुश लांडे, गोरक्ष मेमाणे, तालुका अध्यक्ष प्रशांत वांढेकर, महिला अध्यक्षा ऍड. भारती शिंदे, उपाध्यक्ष संजय पापळ, माजी अध्यक्ष गणेश मुळीक, ऍड. सुरेश फडतरे, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीपज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सिनेस्टार आणि शाहीर सुरेश सूर्यवंशी यांचा शाहिरी जलसा सादर करण्यात आला. यामध्ये संभाजी महाराजांच्या भूमिकेत अमित सागर यांनी सहकाऱ्यांसह भूमिका केली. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रशांत वांढेकर, सूत्रसंचालन उपाध्यक्ष संजय पापळ तर सुनील लोणकर यांनी आभार मानले.

————

यावेळी देण्यात आलेले पुरस्कार व पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे
पुरंदर तालुका पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश सस्ते यांना जलसंधारणाच्या कामाबाबत पुरस्कार जाहीर झाला. त्या बरोबरच सासवड येथील वटेश्वर देवस्थानला संभाजी महाराज आध्यात्मिक पुरस्कार, भिवरी येतील विठ्ठल गोविंद कटके यांना कलापुरस्कार, सासवड येथील आशिष जगताप यांना नाट्य कला गौरव पुरस्कार, जेजुरी येथील अमित सागर यांना विशेष कला पुरस्कार, माहूर येथील महेंद्र रामचंद्र भोसले यांना शैक्षणिक गुरू गौरव पुरस्कार, वाल्हे येथील अनिल चाचर यांना गुरू गौरव पुरस्कार, काळदरी येथील ग्रामसेवक शशांक सावंत यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, आंबळे येथील शिक्षिका मायादेवी नंदकुमार दरेकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार यांना सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)