समाजसेवक ते उपनगराध्यक्ष

एवढ्या कमी वयात उपनगराध्यक्ष होण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य! वडिलांची प्रतिमा व इतर मोठ्या माणसांच्या संस्कारांचा आज माझ्या राजकीय वाटचालीत उपयोग होतो आहे. देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री बारामतीनगरीचे भाग्यविधाते शरद पवार साहेब, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व तरुणांचे नेते अजितदादा पवार व खासदार सुप्रियाताई सुळे, सुनेत्रा वहिनीसाहेब पवार, बारामती नगरीच ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक मोठ्या नेत्यांना जवळून पाहता आले, त्यांच्या वागणुकीमधून खूप काही शिकता आले, त्यातूनच मी घडत गेलो.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लहुजी वस्ताद दहिहंडी संघाचा अध्यक्ष, नंतर वॉर्ड चा अध्यक्ष आणि थेट नगरसेवक, पाणीपुरवठा सभापती आणि त्यानंतर उपनगराध्यक्ष असा सगळा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. वयाच्या 29 व्यावर्षी उपनगराध्यक्ष होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. राजकारण हे समाजाच्या भल्यासाठी करायचं असतं हे बाळकडू लहानपणीच मिळाले.

समाजातील दीनदुबळ्या लोकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करणे ही वडिलांच्या कामाची छाप माझ्यावर आजही कायम आहे आणि पुढेही राहील. वडिलांचा जनसंपर्क अफाट होता; तत्त्वनिष्ठ जीवन जगण्याची त्यांची वृत्ती, मूल्यांवरील श्रद्धा ही माझ्या राजकीय व सामाजिक जीवनाची खऱ्या अर्थाने गुरुकिल्ली ठरली, त्यांच्या अफाट जनसंपर्काची ताकद किती ती मी प्रत्यक्ष राजकारणात आल्यानंतर वेळोवेळी अनुभवली. वडिलांबरोबर काम करण्याबरोबरच संघटन करीत सामाजिक घडी बसविण्यासाठी मी प्रयत्न करीत होतो. माझ्या वयाच्या दहाव्या, बाराव्या वर्षापासुनच गणेश उत्सव मंडळ व लहुजी वस्ताद दहिहंडी संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यास मी सुरुवात केली.

बारामती शहरात व तालुक्‍यात विविध जाती धर्मांच्या लोकांचे संघटन करण्यास सुरुवात केली. माझ्यातील संघटन कौशल्याला ज्येष्ठ नेते किरणदादा यांची जोड मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करीत असतानाच पवार कुटुंबीयांनीही माझ्यावर तेवढाच भक्कम विश्वास दाखविला. साहेब, दादा आणि ताईंनी नेहमीच सहकार्याची भूमिका ठेवली. याच पाठबळावर आता शहर व तालुक्‍यातील शेकडो तरुणांचे संघटन करून राष्ट्रवादी पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

समाजातील महिला, वृद्धांचे विविध प्रश्‍न तसेच बेरोजगार तरुणांना भांडवल उपलब्ध करून देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी माझा प्रयत्न असतो. साईच्छा सेवा ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. मागील सहा वर्षापासून बारामती ते शिर्डी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यामुळेच 10 तरुणांना व्यसनमुक्‍त करण्यात यशस्वी झालो, याचे समाधान आहे. वर्षानुवर्ष पायी दिंडी सोहळ्यात विविध जाती धर्मांचे साईभक्‍त मोठ्या संख्येने सामील होत असतात.

बारामतीकरांचे व माझे भाग्यविधाते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवारसाहेब, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून समाजातील गोरगरीब कुटुंबातील शेकडो महिला, पुरुषांना मोफत शिर्डी, शनिशिंगणापूर दर्शन घडवून आणण्याचा माझा कायम प्रयत्न असतो. या कामामुळे एक वेगळे समाधान मला मिळते. अशा कामांतून राजकारणापेक्षा समाजकारण खऱ्या अर्थाने मोठे असल्याचे समजून घेता आले.

आदरणीय ज्येष्ठ नेते पवार साहेब, अजितदादा आणि गुजरदादा यांच्या नियोजनानुसार मी 2016च्या निवडणुकीसाठी उभे राहिलो. प्रभाग क्रमांक 17 अ मधून प्रथम क्रमांचे मताधिक्‍क्‍य बारामतीकरांनी दिले. समाजकारणातून सेवा करण्याची संधी मला जनतेने दिली, हे माझे भाग्यच. त्यानंतर ज्येष्ठांच्या मार्गदर्शनुसार बारामती शहर तसेच पंचक्रोषितील समस्या सोडविण्यावर भर देत आहे.

सामाजिक कार्य करताना मी समाजातील अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे. याबाबत आपण कायम आग्रही आहे. साई इच्छा सेवा ट्रस्टच्या माध्यमातून 10 मुलांचा पहिली ते पूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे. मानवता आणि शिक्षण हीच ईश्‍वर सेवा आहे, असे माझे मत आहे.अशाच पद्धतीचे काम मी करीत राहील अशी ग्वाही देतो.
– शब्दांकन : दिगंबर पडकर, बारामती


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)