समांतर रस्ते तरी अतिक्रमणमुक्‍त करा

कर्वे रस्त्यावर कोंडी : मेट्रोला विरोध नाही, पण नियोजन व्हावे

पुणे – मेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पार्किंग समस्या, वाहतूक कोंडी रोजचीच डोकेदुखी झाली आहे. या दोन्ही समस्येतून मार्ग काढण्यासाठी कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अशी मागणी कर्वे रस्ता व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात तातडीने काही निर्णय घेतला नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्वे रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मेट्रोचे पिलर उभारणे सुरू आहे. यामुळे या रस्त्यावर नो-पार्किग झोन करण्यात आला आहे. त्याचबरोबर पिलरच्या कामामुळे रस्ताही अरुंद झाला आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांची मात्र मोठी अडचण झाली आहे. नो-पार्किग झोन असल्यामुळे वाहने उभी करता येत नाहीत. ग्राहक या रस्त्यावर न थांबता थेट पुढे निघून जातो. त्याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. यातून मार्ग कसा काढायचा, याबाबत कर्वे रस्ता व्यापारी संघटनेची नुकतीच बैठक झाली. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पर्याय या बैठकीत सूचविण्यात आले आहेत. या बैठकीला संघटनेचे बक्षीससिंग तलवार, राजेश मेहता यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कर्वे रस्त्यावर येण्यासाठी अनेक समांतर छोटे रस्ते (लेन) आहेत. याचा वापर वाढविल्यास नक्कीच ही समस्या सुटू शकेल. पण, या रस्त्याला जे समांतर रस्ते आहेत, त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. छोट्या-छोट्या स्टॉल धारकांनी हा रस्ता व्यापला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनेसुद्धा उभी करता येऊ शकत नाहीत. जर वाहने उभी केली, तर एका बाजूला स्टॉल आणि दुसऱ्या बाजूला वाहने यामुळे रस्ता आणखी अरुंद होईल व कर्वे रस्त्यावर तर वाहतूक कोंडी होतेच ती समांतर रस्त्यावरसुद्धा सुरू होईल. त्यामुळे ही अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावीत, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

योग्य तोडगा काढा; व्यापाऱ्यांची भूमिका
कर्वे रस्त्यावरील मेट्रो सावरकर स्मारकाजवळील पादचारी मार्गावरून नदी पात्रात उतरणार आहे. दरम्यान, या मार्गावरील 25 दुकाने हटविण्यात येणार आहेत. या व्यावसायिकांना कर्वे रस्त्याला जोडून असणाऱ्या संजीवन हॉस्पिटल ते शारदा आर्केड रस्त्यावर स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. म्हणजे, जर कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली तर पर्यायी म्हणून संजीवन हॉस्पिटल ते शारदा आर्केड या रस्त्याचा वापर करता येऊ शकत होता. पण आता ते सुद्धा होणार नाही कारण हे स्टॉल या रस्त्यावर आल्यावर पुन्हा रस्ता अरुंद होणार आहे. तरी याबाबत पालिकेने विचार करावा, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या.

मेट्रोचे काम खूप दिवस चालणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीच्या दृष्टीने पर्याय काढला पाहिजे. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे. ही अतिक्रमणे हटविली, तर आमचा त्रास थोडा फार कमी होणार आहे. याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा, अन्यथा व्यापारी आंदोलनासारखा मार्ग स्वीकारतील.
– अजित सांगळे, कार्याध्यक्ष, कर्वे रस्ता व्यापारी संघटना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)