समस्यांच्या विळख्यात आदिवासी वसतीगृह

वडगाव मावळ – येथील महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाचे आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह पूर्णपणे समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. अपुऱ्या जागेतील समस्यांच्या विळख्यात असलेल्या या वसतीगृहाचे त्वरित स्थलांतर करुन सुविधा देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

मावळ तालुक्‍याचे मुख्यालय वडगाव-कातवी नगर पंचायतीच्या हद्दीत मावळ तालुक्‍यातील आदिवासींच्या मुलांसाठी सन्‌ 2007 साली वसतीगृह तयार करण्यात आले. आठवी ते पदव्युत्तर शिक्षणासाठी 75 मुलांची क्षमतेचे हे वसतीगृह आहे. हे वसतीगृह विश्वनाथ हिंगे यांच्या मालकीच्या जागेत भाडेतत्वावर सुरू आहे. ही जागा अपूर्ण व गैरसोयीची असल्याने 75 मुलांची क्षमता असताना केवळ 50-55 मुलांनाच प्रवेश दिले जातात. उर्वरीत जागा भरल्या जात नसल्याने काही आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. वसतीगृहाच्या खिडक्‍या व दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असून पावसाळ्यात खोलीत पाणी गळते. वसतीगृहाचे गृहपाल आठवड्यातून एकदा येतात. विद्यार्थ्यांना मिळणारा 500 रुपये भत्ता वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक हलाखीत दिवस काढावे लागत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यार्थ्यांना शिकावे तरी कसे?
येथे पूर्वी देखील निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जा होते. परंतु 15 जूनपासून शाळा व महाविद्यालये सुरू झाले असून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना अद्यापही जेवण दिले जात नाही. त्यात विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. घरचे अठरा विश्व दारिद्य्र आणि तरीही शिकून मोठे होण्याच्या जिद्दीने ही मुले येथे राहत आहेत. केवळ शिक्षणासाठी हे विद्यार्थी जेवण व शैक्षणिक सुविधा मिळतील यासाठी प्रतीक्षा करत आहे. या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. अभ्यासासाठी ग्रंथालय तसेच संगणक नाही. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण, व्यायामासाठी व्यायामशाळा नाही. उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी खोलीत पंखे नाहीत. खोलीच्या खिडक्‍या तुटलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रंगरंगोटी केलेली नाही. वसतीगृहात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. ढेकूण व मच्छर अधिक असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. एकाच खोलीत अनेक विद्यार्थी राहत असल्याने त्यांचा श्वास गुदमरत आहे. मुलांना मिळणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असते. ठेकेदार विद्यार्थ्यांवर दादागिरी करतात.

मावळ तालुक्‍यात असलेल्या वसतीगृहात नंदुरबार, पालघर, जळगाव, धुळे, अहमदनगर आदी परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी आहेत. मावळातील विद्यार्थ्यांना या वसतीगृहात प्रवेश मिळत नसल्याने अनेकांचे शिक्षण अपूर्ण राहत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून अपुऱ्या सुविधा व समस्यांच्या विळख्यात असलेल्या या वसतीगृहाचे स्थलांतर करण्याची मागणी केली जात असून टाळाटाळ केली जात आहे. वसतीगृह केवळ नावालाच असून सुविधांची वानवा आहे. येथे सुरक्षा रक्षक नाहीत, सीसीटीव्ही नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा देखील प्रश्‍न आहे.

या वसतीगृहावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव या कार्यालयाचे नियंत्रण असते, पण कधीच या वसतीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत. या वसतीगृहात लिपिक, शिपाई पद अनेक वर्षांपासून रिक्‍त आहेत. वर्दळीच्या ठिकाणी असलेले वसतीगृह कोणाच्याही लक्षात येत नाही. वसतीगृहाचे सुसज्ज जागेत त्वरित स्थलांतर करुन शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा त्वरित देण्याची मागणी विद्यार्थी सचिन रावते, गोविंद पवार, हर्षल पावरा, विनायक पाडवी, मंगलसिंग पावरा, संतोष पावरा, मनोज पाडवी, प्रेम गिराटे, चेतन काटे, सागर कोकणे आदींनी केली आहे.

विश्वनाथ हिंगे यांनी सांगितले की, ही इमारत भाडेतत्त्वावर घेतली आहे. गेल्या तीन वर्षांपासूनचे भाडे थकले आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे वसतीगृहाची अवस्था बिकट झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)