समता आश्रमशाळेत पार पडली ‘शिक्षक संवाद कार्यशाळा ‘

विद्याप्राधीकरणाच्या (एससीईआरटी) उपसंचालक शोभा खंदारे उपस्थितांना मार्गदर्शन करताना.

लोणंद, दि. 15 (प्रतिनिधी) – ऊसतोडणी, वीटभट्टी व दगडखाण कामगारांना पोटासाठी सहा-सात महिने स्थलांतर करावे लागते. कुठल्याही सोयीसुविधा, सुरक्षा नसताना ते जगतात. त्यांच्याप्रती आपण संवेदनशील असलो तरच त्यांची मुले शाळेत आणू शकतो. या पालकांची मने जिंका. मुलांना शाळेत घेऊन या, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या. ती पूर्णपणे आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन विद्या प्राधीकरणाच्या (एससीईआरटी) उपसंचालक शोभा खंदारे यांनी केले.
शालेय शिक्षण विभाग, टाटा ट्रस्ट व जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने ऊसतोड मजुरांची मुले नजिकच्या शाळात दाखल करण्यासाठी ‘आशा’ प्रकल्प चालविला जातो. प्रकल्पाच्या वतीने बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटण या चार तालुक्‍यातील 86 शाळांच्या शिक्षकांसाठी नीरा (ता. पुरंदर) नजीक पाडेगाव येथील समता आश्रमशाळेत’शिक्षक संवाद कार्यशाळा’ नुकतीच आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) अण्णासाहेब मगदूम होते. एससीईआरटीच्या अनुराधा चव्हाण, विस्तार अधिकारी अनिल जगदाळे, संजय गायकवाड, सतीश कुदळे, रमेश जरांडे, मुख्याध्यापक सुभाषचंद्र माने, मुख्याध्यापिका विमल सूर्यवंशी, समीक्षा संध्या मिलिंद, नवनाथ चोरमले, अजहर नदाफ, बिल्कीस सय्यद आदी उपस्थित होते.
नखंदारे म्हणाल्या, कुठल्याही कारणांवरून मुलांमध्ये भेद करू नका. त्यांनाही आत्मसन्मान असतो. स्थलांतरीत मुलं दूरच्या गावावरून आल्याने भयभीत व असुरक्षित असतात. त्यांना सुरक्षित वातावरण, आपुलकी आणि प्रेम द्या. या मुलांच्या पालकांकडे स्वतःहून जा आणि पालकांचा विश्वास संपादन करा. त्याशिवाय पालक मुलांना पाठविणार नाहीत. मुलांना लिहता-वाचता येत नसेल तर शिक्षणाबाबत नकारात्मक होतात. मुली वयात आल्या की बालविवाह होतो. त्या मुलींनाही जपले पाहिजे, असे खंदारे म्हणाल्या.
शिक्षणाधिकारी अण्णासाहेब मगदूम यांनीही मनोगत व्यक्‍त केले. प्रकल्प प्रमुख संतोष शेंडकर यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक मार्गदर्शक अनिल चाचर यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रप्रमुख दशरथ धायगुडे यांनी आभार मानले.

तुमचा-आमचा भेद करू नका
टाटा ट्रस्टससारख्या संस्था स्थलांतरीत व शालाबाह्य मुले शोधून आपल्यापर्यंत आणतात ही आपल्यासाठी मोलाची मदत आहे. परंतु या प्रत्येक मुलाची शिक्षणाची जबाबदारी शिक्षण विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था व शाळा समिती यांचीच आहे. ती शिक्षण हक्क अधिनियमानुसार पार पाडणे आपले कर्तव्य आहे. आमची मुले-तुमची मुले, स्थानिक मुले-बाहेरची मुले, बीडची मुले असा भेद करू नका असे आवाहन खंडाळ्याच्या गटशिक्षणाधिकारी अलका मुळीक यांनी केले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)