सभासद विद्यार्थ्यांनाच “रिफेक्‍टरी’चे जेवण

* अन्य विद्यार्थ्यांची सुविधा 1 एप्रिलपासून बंद करणार
 * जेवणात अळ्या आढळल्यानंतर प्रशासनाचे पाऊल

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 25 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “रिफेक्‍टरी’ (भोजनालय) येथे गेल्या आठवडाभरात विद्यार्थ्यांच्या जेवणात तीन-चार वेळा अळ्या आढळून आल्या. या प्रकारावर पायंबद बसण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने पाऊल उचलले आहे. “विद्यापीठाने आता रिफेक्‍टरीचे सभासद असलेल्या विद्यार्थ्यांनाच जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. सभासद नसलेल्या विद्यार्थ्यांना रिफेक्‍टरीची सुविधा येत्या 1 एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे,’ अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

विद्यापीठाच्या “रिफेक्‍टरी’त दररोज 800 विद्यार्थी जेवण करतात. तसेच विद्यापीठात प्रवेश नसलेले विद्यार्थी, अभ्यांगत असे साधारणपणे 400 असे एकूण 1,200 जण जेवण करतात. अल्प दरात व त्यातुलनेत योग्य दर्जाचे जेवण “रिफेक्‍टरी’तून दिले जाते. मात्र, “रिफेक्‍टरी’चे टेंडर बदलल्यानंतर नेमका जेवणाचा दर्जा का घसरतो, असा प्रश्‍न आहे. त्यातही तक्रारी करणारे हे विशेषत: “रिफेक्‍टरी’चे सभासद नसलेले विद्यार्थी असतात, असे विद्यापीठ प्रशासनचे म्हणणे आहे.

“विद्यापीठातील रिफेक्‍टरीच्या जेवणात एखाद्या दिवशी जेवणात आळ्या आढळणे ही बाब समजू शकतो. मात्र, सलग दोन-तीन दिवसांत जेवणात अळ्या आढळून येणे, हे संशयास्पद आहे. हा कुणाचा खोडसाळपणा तर नाही ना?’ याची चाचपणी विद्यापीठ प्रशासनकडून सुरू आहे. मात्र, विद्यापीठाच्या “रिफेक्‍टरी’वरून हा प्रकार पुन्हा होऊ नये, या पार्श्‍वभूमीवर संबंधित समितीची बैठक झाली. त्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी दि.1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे.

“रिफेक्‍टरी’चा वाढता ताण लक्षात घेता जे विद्यार्थी सभासद आहेत, त्यांनाच आता “रिफेक्‍टरी’चे जेवण दिले जाईल. अन्य विद्यार्थ्यांना हॉस्टेल क्रमांक 9, विधि विभाग, अनिकेत कॅन्टिंन येथे सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना “रिफेक्‍टरी’त जेवण बाहेर जाऊन खाण्यास मनाई करण्यात येणार आहे, असा निर्णय “रिफेक्‍टरी’ समितीने घेतला आहे.
– डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

असे आहेत नवीन नियम
* “रिफेक्‍टरी’त सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करणार
* “रिफेक्‍टरी’त टीव्ही बंद; विद्यावाणी रेडिओ सुरू
* एकाच ताटात दोघांना जेवण करता येणार नाही
* “रिफेक्‍टरी’तील जेवण बाहेर नेऊन खाण्यास मनाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)