सभापती गायकवाड यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारगळला स्लग- सुजित झावरे व आ.विजय औटी पडले तोंडघशी

पारनेर – पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात अविश्वास ठरावासाठी बोलविलेल्या सभेला गायकवाड वगळता एकही संचालक हजर न राहिल्याने गायकवाड यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारगळला. गेल्या पंधरा दिवसांपासुन पारनेर तालुक्‍यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या अविश्‍वास ठराव सुजित झावरे व आ.विजय ओटी यांच्या तोडघशी पडला. गायकवाड यांच्यावर आलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी सहाय्यक निबंधक सुखदेव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता बोलविण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीस एकही संचालक उपस्थित न राहिल्यामुळे गायकवाड यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला आहे. झावरे व गायकवाड गटात संचालकांच्या पळवापळवीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. सहाय्यक निबंधक सूर्यवंशी, सहकार अधिकारी सुनील शेलुकर, प्रभारी सचिव शिवाजी पानसरे, तसेच कर्मचारी राजू चेडे हेच सभागृहात उपस्थित होते. पंधरा मिनिटे वाट पाहूनही एकही संचालक न आल्याने बैठकीचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी ठराव बारगळल्याचे जाहीर करून बैठक संपल्याचे जाहीर केले.
दरम्यान, गायकवाड हे तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या नाराज गटाची सुपा येथे पार पडलेल्या बैठकीला हजर राहताच सुजित झावरे यांनी त्यांच्या विरोधात मोहिम हाती घेतली. प्रांरभी सह्यांचे अधिकार काढून अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या. यासाठी त्यांनी आ. विजय औटी गटाची साथ घेतली. यावरुन पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या नाराज गटाने तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी घेवुन पारनेर तालुक्‍यातील चालु घडामोडीची माहिती दिली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी यामध्ये लक्ष घातले. या अविश्वास ठरावासाठी संचालक पळवा पळवीचा थरार चांगलाच ठरला. प्रारंभी सुजित झावरे यांच्याकडे असलेले अनेक संचालक नाट्यमयरित्या गायकवाड गटात सामिल झाल्याने अखेर आज होणारा अविश्वास ठराव बारगळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)