सभागृहात विद्यमानांची आदळआपट

  • नियमांची पायमल्ली ः डॉ. रॉय-साळवे पदोन्नती विषयावरुन खडाजंगी

पिंपरी, (प्रतिनिधी) – मागील अडीच वर्षे प्रलंबित असलेल्या डॉ. अनिल रॉय आणि डॉ. पवन साळवे यांच्या पदोन्नतीस उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तरीही, भाजपने हा विषय उपसूचनेद्वारे मंगळवारी (दि. 20) सभागृहासमोर आणला. या विषयावर चर्चा केल्यास न्यायालयाचा अवमान होईल, असे आदेशात नमूद असताना देखील या विषयावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. न्यायालयाचा अनादर करत महापौरांनी चर्चेविना हा विषय तातडीने मंजूर केल्याने विरोधकांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे सभागृहाचे नियम पायदळी तुडविले गेले. यामुळे महापालिका सभागृहाच्या नियमांची नाचक्की झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदासाठी डॉ. अनिल रॉय आणि डॉ. पवन साळवे यांच्यात सेवाज्येष्ठता आणि शैक्षणिक अर्हतेच्या मुद्यावरून वाद सुरु आहेत. हा विषय उच्च न्यायालयाने स्थगित ठेवला आहे. न्यायालयाने जुलै 2018 पर्यंत या विषयाला स्थगिती दिली आहे. न्यायालयाधीन असलेल्या या विषयास सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपसूचनेसह आज सर्वसाधारण सभेपुढे आणले. न्यायालयाची स्थगिती असलेल्या विषयाला उपसूचना देऊन सभागृहासमोर आणल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने सत्ताधाऱ्यांचे कामकाज संशयास्पद असल्याचा आक्षेप घेत हा विषय भरसभेत रोखला. तरीही, महापौरांनी घाईघाईत या विषयाला मंजुरी जाहीर केल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच चिघळले. या दरम्यान सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्‍त आणि प्रशासनास याबाबत धारेवर धरले.

आयुक्‍त सक्षम नाहीत-कदम
माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या की, प्रशासनाशी संबंधित विषयावर निर्णय घेण्यासाठी आयुक्‍त सक्षम नाहीत. त्यामुळे वैद्यकीय विभागातले अधिकारी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने या विषयामध्ये संदिग्धता वाटत असल्याने त्याला जुलै पर्यंत स्थगिती दिली. तसेच, गेली दोन ते अडीच वर्षे हा विषय राष्ट्रवादीने तहकूब ठेवला. आता पुन्हा प्रशासनाने उपसूचनेद्वारे हा विषय सभागृहासमोर आणला. आम्ही लोकांचे प्रश्‍न सोडवायचे की प्रशासनाचे? अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, आयुक्‍तांमध्ये स्वतःचे अधिकार वापरण्याची हिम्मत नाही. त्यामुळे प्रशासनाचे चेंडू आमच्या कोर्टात फेकले जात आहेत. न्यायालयाचा आदेश वाचून दाखविण्याची मागणी कदम यांनी केली. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उच्च न्यायालयाचा आदेश वाचून दाखविला.

तोंडघशी पाडण्याचा प्रशासनाचा उद्योग – सावळे
सीमा सावळे म्हणाल्या की, जे निर्णय प्रशासनाच्या हाती आहेत. ते आमच्यासमोर का आणले जात आहेत? न्यायालयाची सक्‍त स्थगिती असताना विषय चर्चेसाठी पुन्हा सभागृहासमोर आणून आम्हाला तोंडघशी पाडण्याचा उद्योग प्रशासनाने चालविला आहे. सभागृह न्यायालयापेक्षा मोठे नाही. चुकीची माहिती देऊन कायदेतज्ञ ऍड. सतीश पवार यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला. कोर्टाचा अवमान होणार नसेल तर दोघांना वैद्यकीय विभागाचा समांतर अधिकार द्या, अशी सूचना सावळे यांनी केली.

दुटप्पी भूमिका – कलाटे
गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, आयुक्‍त शांत बसून दुटप्पी भूमिका घेत आहेत. डॉ. रॉय आणि डॉ. साळवे यांच्या विषयावर निर्णय घेतला तर शिवसेना तटस्थ राहील. त्यामुळे निर्णय काय घेणार आहात हे स्पष्ट करा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, सचिन चिखले म्हणाले, या विषयावर चर्चा झाली तरीही, न्यायालयाचा अवमान होणार आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान न करता याबाबत निर्णय जाहीर करावा किंवा हा विषय मागे घ्यावा.

आजी-माजी महापौरांमध्ये शाब्दिक चकमक
महापौर नितीन काळजे यांनी घाईघाईत डॉ. रॉय आणि डॉ. साळवी यांच्या विषयाला मंजुरी जाहीर करताच माजी महापौर मंगला कदम यांनी उठून महापौरांकडे हातवारे करत या निर्णयाला विरोध केला. न्यायालयाचा अवमान करून हा विषय मंजूर करता येत नाही, असे त्या जोरजोराने सांगू लागल्या. या दरम्यान महापौर काळजे यांचा तोल गेला आणि कदम व काळजे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. मला सभागृह चालवायला शिकवायचे नाही, अशा शब्दात महापौरांनी कदम यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे कदम यांनी सुध्दा महापौरांनी ऐकून घेण्याचा संयम बाळगायला हवा. तुमचा संयम यातून स्पष्ट दिसत आहे, असे सांगताच महापौरांनी कदम यांना खाली बसण्याचा इशारा केला. शेवटी सभागृहनेते एकनाथ पवार यांनी वैद्यकीय विभागाचे अधिकार विभागून डॉ. साळवे आणि डॉ. रॉय यांच्याकडे द्यावेत. जो अधिकारी काम करत नाही, त्याचा राजीनामा घ्यावा, अशी सूचना केली. ऍड. सचिन भोसले यांनी न्यायालयाची बाजू मांडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)