सभागृहात आता राष्ट्रवादीचाच “आवाज’

– सत्ताधारी भाजपचा हटके निषेध : आवाज दाबला जात असल्याचा आरोप

पिंपरी – एकेकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीचा आक्रमक आवाज दाबण्याचे काम सत्ताधारी भाजपकडून केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. ही अरेरावी मोडून काढण्याकरिता महासभा आणि स्थायी समितीच्या साप्ताहिक सभागृहात स्वतंत्र ध्वनिवर्धक घेऊन, राष्ट्रवादीचे नगरसेवक आपली भुमिका मांडणार असल्याची माहिती साने यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेते पद आहे. भाजपच्या चुकीच्या कामांना विरोध करुन, विकासकामांमधील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा मानस साने यांनी मानस केला आहे. त्याकरिता ते रणनिती आखत आहेत. त्यानुसार पक्षाच्या विद्यमान नगरसेवक व नगरसेविकांशी ते दररोज विरोधी पक्षनेते कार्यालयात संवाद साधत आहेत. विविध विषय समित्यांमध्ये मिळालेल्या प्रतिनिधित्वामुळे राष्ट्रवादीची भुमिका मांडत, चुकीच्या कामांना कशाप्रकारे विरोध करायचा, याचे ते नगरसेवकांना मार्गदर्शन करत आहेत.

दरम्यान, महासभा अथवा स्थायीच्या साप्ताहिक बैठकीत एकहाती सत्ता असलेल्या भाजपकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपली विरोधी भुमिका मांडू न देण्यासाठी अटोकाट प्रयत्न केला जात आहे. त्याकरिता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बाजू न मांडण्याकरिता ध्वनिवर्धक बंद करण्याच्या सुचना कर्मचाऱ्यांना केल्या जात आहेत. त्यानुसार ध्वनिवर्धक नियंत्रण कक्षातुन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे ध्वनिवर्धक बंद केल जातात. परिणामी, प्रसार माध्यमे व अधिकाऱ्यांपर्यंत राष्ट्रवादीची भुमिका पोचविण्यात अडसर निर्माण होत आहे.

ही बाब लक्षात आल्यानंतर दत्ता साने यांनी राष्ट्रवादीचा दाबला जाणार आवाज सभागृहात बुलंद करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणेकडून वापरला जाणारा बटरी चार्जिंगवर चालणारा ध्वनिवर्धक सभागृहात आणण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्याकरिता बाजारात बॅटरीवर चालणारा उच्च दर्जाचा ध्वनिवर्धक खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. किमान या प्रयत्नामुळे तरी भाजप राष्ट्रवादीचा आवाज दाबू शकणार नाही, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी नगरसेवकांचे मार्गदर्शन घेणार
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्याने महापालिका सभागृह, राजकारण, सभाशास्त्र अथवा महापालिकेशी संबंधित असलेल्या अन्य पूरक बाबींचा अनुभव असलेल्या अनेक नगरसेवकांना अज्ञातवासात जावे लागले आहे. पक्षालादेखील त्यांची दखल घेणे गरजेचे न वाटल्याने बहुतांशी नगरसेवक नाराज आहेत. ही बाब लक्षात घेत, साने यांनी राष्ट्रवादच्या सर्व नगरसेवकांची यादी व संपर्क क्रमांक मागवुन घेतले आहेत. त्यांना सन्मानपुर्वक विरोधीपक्ष कार्यालयात बोलावून, पक्षाच्या ध्येयधोरणांमध्ये सल्ला घेणार असल्याची माहिती साने यांनी दिली.

सत्ताधारी-विरोधक संघर्ष तीव्र
भाजपला महापालिकेत सत्तेवर येऊन वर्षभराचा कालावधी लोटला आहे. यापुर्वीचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी राष्ट्रवादीची आक्रमक भुमिका योग्य प्रकारे मांडली नसल्याचा आरोप राष्ट्रवादीतुनच होत होता. त्यानंतर दत्ता साने याच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी स्वतंत्र ध्वनिवर्धकासारखा हटके प्रयोग करण्याचे त्यांनी सुतोवाच केले आहे. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)