#सबलीकरण: देशविकासाच्या घटस्थापनेसाठी… 

हेमंत देसाई 

जगातील 131 देशांत स्त्रियांच्या रोजगार सहभागाच्या निकषावर भारताचा 120 वा नंबर लागतो. भारतातील निम्मी लोकसंख्या, म्हणजे स्त्रिया पुरेशा प्रमाणात नोकऱ्या व व्यापार, उद्योग व व्यवसाय करत नसल्या, तर सर्वसमावेशक विकास होऊ शकणार नाही. चीनमध्ये जीडीपी किंवा सकल राष्ट्रीय उत्पन्नात स्त्रियांचा वाटा 40 टक्‍के आहे, तर भारतात केवळ 17 टक्‍के. जर देशातील एकूण स्त्रियांपैकी 50 टक्‍के स्त्रिया जरी नोकरी करू लागल्या, तरी भारताचा विकासदर दीड टक्‍क्‍यांनी वाढून, 9 टक्‍कयांवर जाऊन पोहोचेल. 

नवरात्रीचा उत्सव हा स्त्रीशक्‍तीचा जागर करण्याचा समय असतो. म्हणून सुरुवातीलाच मूळ म्हैसूरच्या असलेल्या गीता गोपीनाथ यांचा अभिमानाने उल्लेख करतो. आयएमएफ किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची निवड घोषित करण्यात आली आहे. या जगप्रसिद्ध संस्थेवर मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून महिलेची झालेली ही पहिलीच नियुक्‍ती होय. तसेच रघुराम राजन यांच्यानंतर दुसऱ्या भारतीय व्यक्‍तीची अर्थतज्ज्ञपदी झालेली ही नेमणूक आहे. गीता गोपीनाथ या दिल्ली विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समध्ये शिकल्या. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. मग शिकागो आणि हॉर्वर्ड विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्राचे अध्यापन केले. स्थूल अर्थशास्त्र आणि व्यापार हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. जगातील 45 वर्षांच्या आतल्या 25 सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञांत गीता यांचा समावेश होतो. गीता यांनी केरळ मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार म्हणूनही 2015 साली काम केले. आयएमफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तिना लगार्ड यांनी गीता गोपीनाथ यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा गौरव केला आहे. आज या निमित्ताने, भारताची विकासप्रक्रिया आणि त्यात महिलांचा समावेश याबद्दलची चर्चा करण्याची गरज आहे. या प्रक्रियेत महिलांचा सहभाग खरोखरच वाढवण्याची गरज आहे.

-Ads-

वर्ष 1994 ते 2012 या कालावधीत भारतातील 13 कोटी लोक गरिबी रेषेखालून बाहेर आले. मुंबईत भरलेल्या महिला मंचाच्या बैठकीत जागतिक बॅंकेच्या दक्षिण आशियाई विभागाच्या अध्यक्ष नेट डिक्‍सन यांनी याबद्दल चांगला मुद्दा मांडला होता. त्या म्हणाल्या होत्या, भारताने संपादलेले हे यश कौतुकास्पद आहेच. पण जर अधिक महिला रोजगार करत असत्या, तर यापेक्षाही जास्त उल्लेखनीय यश मिळवता आले असते.’ वर्ष 2012 साली 79 टक्‍के पुरुष नोकरी करत होते. तर फक्‍त 27 टक्‍के स्त्रियांना नोकरी होती. धक्‍कादायक बाब म्हणजे, वर्ष 2005 ते 2012 या काळात दोन कोटी स्त्रिया रोजगारातून बाहेर फेकल्या गेल्या. दोन कोटी म्हणजे, श्रीलंकेची लोकसंख्या! वास्तविक भारतात झपाट्याने शहरीकरण होत आहे. तेव्हा त्या प्रमाणात स्त्रियांनी उंबरठ्याबाहेर पडून नोकऱ्या करण्याची आवश्‍यकता आहे. पण तसे घडलेले नाही.

ग्रामीण रोजगार घटत आहे आणि खेड्यापाड्यातून शहरात येऊन नोकऱ्या करणाऱ्या स्त्रिया कमी आहेत. त्यात ठिकठिकाणी बस, रेल्वे, भररस्त्यात, शाळा-कॉलेजांत आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. स्त्रियांना सुरक्षित प्रवास आणि एकूणच सार्वजनिक सुरक्षितता पुरवली, तर नोकरी धंद्यातील त्यांचा सहभागही वाढेल. भारतात आज असे कुठलेही क्षेत्र नाही, जे स्त्रियांनी पादाक्रांत केलेले नाही. बायका रिक्षा, टॅक्‍सी, बस, ट्रक, विमाने चालवतात. त्या सैन्यातही आहेत. बॅंकिंग, पायाभूत सुविधा, सेवा उद्योग अशा सर्व क्षेत्रांत त्या उच्च पदांवरही बघायला मिळतात. काही राज्यांचे मुख्यमंत्रिपदसुद्धा त्या समर्थपणे सांभाळत आहेत. परंतु तरीही, शाळांमधून मुलींची गळती 100 टक्‍के रोखण्याचे काम व्हायला हवे. अनेक कुटुंबांत पतीचे वेतन वाढले वा आर्थिक परिस्थिती सुधारली, की पत्नी नोकरी वा व्यवसाय सोडून देते.

बालसंगोपनाची जबाबदारी कुटुंबातील सर्वांनी विभागून उचलली, तर स्त्रीला घरात थांबण्याची गरज राहणार नाही. स्त्रियांचे आर्थिक सक्षमीकरण झाले, की दारिद्य्र निर्मूलन अधिक वेगाने होते. याचे कारण, स्त्रिया आपल्या उत्पन्नात जास्त बचत करून ते कुटुंबाच्या व समाजाच्या भल्यासाठी खर्च करतात. या संदर्भात जागतिक बॅंकेने एक चांगले पाऊल उचलले आहे. गरीब ग्रामीण स्त्रियांचे स्वयंसाह्य गटांमार्फत सक्षमीकरण करण्यासाठी या बॅंकेने मागच्या 15 वर्षांत भारतातील विविध राज्यांना तीन अब्ज डॉलर्स दिले आहेत. त्यामधून साडेचार कोटी स्त्रियांना कौशल्ये, बाजारपेठा आणि व्यवसाय विकास सेवा यांचा फायदा मिळवता आला. त्यामधून अनेक उद्योगिनी तयार झाल्या. या महिलांची पाहणी केली असता, त्यांना अधिक अन्न व आर्थिक सुरक्षितता लाभलेली आहे.

“स्किल इंडिया’ मोहिमेतसुद्धा जागतिक बॅंकेची मदत झालेली आहे. त्या त्या भागातील स्त्रियांच्या गरजा लक्षात घेऊन, प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी केली जाते. शिकाऊ स्त्रियांना लहान पोरेबाळे आहेत हे लक्षात घेऊनच प्रशिक्षणाच्या वेळा निश्‍चित केल्या जातात. किशोरवयीन मुलींना माध्यमिक शिक्षण पूर्ण करता येऊन, नोकरीच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी झारखंडमध्ये एक उपक्रम जागतिक बॅंकेतर्फेच राबवला जात आहे.

गरोदरपणाच्या रजेत दुप्पट वाढ, स्त्रियांच्या व्यवसायासाठी सवलतीची कर्जे, 50 पेक्षा अधिक व्यक्‍ती कामाला असतील, तर कंपन्यांमध्ये पाळणाघर सक्‍तीचे, ही धोरणे राबवण्यात आल्याचा फायदा महिला विकासाच्या दृष्टीने जरूर होणार आहे. जगातील 7.5 टक्‍के स्त्रिया भारतात राहतात. भारतातील माता मृत्यूदर घसरत आहे. महिला साक्षरता वाढत आहे; परंतु या दोन्ही गोष्टींचा वेग कमी आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जेंडर गॅप इंडेक्‍समध्ये स्त्रीपुरुष विकासातील तफावतीत भारताचा क्रमांक 135 देशांत 113 वा लागतो. वर्ष 2011 च्या जनगणनेनुसार, सहा वर्षाखालील मुलांमध्ये एक हजार मुलांमागे 914 मुली असे प्रमाण आहे. वर्ष 2001 मध्ये हे प्रमाण 927 होते. याचा अर्थ, लिंगगुणोत्तरात देशाची प्रगती नसून अधोगती झाली आहे. हे आपल्याला बदलावे लागेल. जागतिक पातळीवरील स्त्रीपुरुष समानतेचे प्रमाण जर 1.0 असेल, तर भारतातील हे प्रमाण 0.3 टक्‍के आहे. स्त्रिया हा समाज व कुटुंबाचा पाया असतो. पारंपरिक कामांमध्ये सुद्धा सृजनशीलता, कौशल्य, बुद्धी, कष्ट आणि निष्ठा हे गुण स्त्रियांमध्ये अधिक दिसून येतात.

देशातील 70 टक्‍के लोक ग्रामीण भागात राहतात. तेथे शिक्षण व आरोग्याच्या सोयीसुविधा मुबलक प्रमाणात पोहोचविल्या पाहिजेत. गरीब कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी असेल, तर मुलीऐवजी मुलाला दूध वा सकस अन्न दिले जाते. नामांकित शाळेत त्याला घातले जाते. यासाठी सामाजिक मनोवृत्तीत बदल झाला पाहिजे. तसेच ई-शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रसार होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत “आशा कार्यकर्त्यांचे’ जाळे स्त्रिया व मुलांचे आरोग्य सुधारण्याची मोठी कामगिरी बजावत आहे. त्यासाठी भरीव तरतूद केली पाहिजे. इला भट्ट यांच्या “सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’ किंवा “सेवा’ मार्फत स्त्रियांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम वर्षानुवर्षे केले जात आहे. या दिशेने इतर संस्थांनीही अधिकाधिक प्रयत्न केले, तर महिलांची उन्नती कमालीच्या गतीने होऊ शकेल.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)