सबकुछ ‘डिजिटल’!

गेल्या महिन्यातली गोष्ट आहे, ‘डिंग-डॉंग-डिंग-डॉंग’ दारावरच्या बेलचा आवाज खणाणल्याने झोपेतून कसाबसा उठत दार उघडले. दार उघडताच समोर वायरमन काकांनी दर्शन देत, प्रकट होण्याचा हेतू लाईट ‘कट’ करणे असल्याचा निर्वाळा त्यांनी केला. काहीशा करड्या आवाजातच “बिल येऊन महिने झाले काय करत असता रे तुम्ही पोरं?” असं म्हणत त्यांनी ‘बिलच नाही मिळाल’ वैगरे वैगरे कारण देण्याचा माझा चान्स आधीच हिरावून घेतला. ‘सॉरी काका’ असं म्हणत मी आता यांना कसं कटवायचं असा विचार करू लागलो. “काका उद्या फिक्‍स भरतो आजच्या दिवस जाऊ द्या ना” अशी केविलवाणी विनवणी करत मी काकांनी आलेल्या पावलांनी परत जावं, अशी अपेक्षा करू लागलो. मात्र काकांचा बहुधा ‘दया, क्षमा, शांती’चा अजिबातच मूड नसल्याने त्यांनी लगेचच बिल भरा, असा तगादा लावला. काका एकतर बिल भरल्याशिवाय किंवा लाईट कट केल्याशिवाय परत जाणार नाहीत असा अंदाज आल्याने बाकीच्या ‘रूममेट्‌स’ला फोनाफोनी सुरु केली.

बाकीच्या तिन्ही रूममेट्‌स सोबत फोनवर गहन चर्चा झाल्यानंतर सर्वांचं लाईट बिल ‘ऑनलाईन’ भरण्यावर एकमत झाल्याने सर्वांनी आपापला ‘शेअर’ डायरेक्‍ट माझ्या अकाउंटवर ‘भीम’ केला. महावितरणने आता डायरेक्‍ट लाईट बिलावरच ‘क्‍यूआर’ कोडची सोय करून दिली असल्याने कुठल्याच डिटेल्स न भरता पेमेंट फक्त कोड स्कॅन करून ‘सोयीस्कर’रित्या पार पडलं. लाईट बिल भरल्याने वायरमन काकांचा चेहरा देखील ‘स्माईल’ करत होता. काका गेल्यावर सुटकेचा निश्वास टाकत मी पुन्हा बेडवर जाऊन पडलो, मनात अनेक विचार दाटून आले होते. रूममेट्‌सने बसल्या ठिकाणावरून माझ्या बॅंक अकाउंटवर जमा केलेले पैसे, माझं रुमवरून एका क्‍लिकवर लाईट बिल भरणं. किती सोप्पी झालीय ना लाईफ? असा माझा मलाच प्रश्न पडला. एकदम फ्लॅशबॅकमध्ये जाऊन लहानपणी लाईटबिल भरल्यावर खाऊसाठी मिळणारे सुट्टे पैसे त्यासाठी ‘मी बिल भरणार-मी बिल भरणार’ अशी मोठ्या भावाची आणि माझी लागणारी चढाओढ अशा सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून जाऊ लागल्या. त्या मोमेन्टला ‘छोट्या-छोट्या’ गोष्टीतला आनंदाची लाईफ मधली इम्पॉर्टन्सच उमजल्यासारखं वाटलं. मनात विचार आला की ‘आता बस इथून पुढे ऑनलाईन बंद!’

परवा दिवशी या महिन्याचं लाईट बिल पाहून मागच्या महिन्यात ‘ऑनलाईन बंदची’ घेतलेली शपथ आठवली, थोडा विचार केला. डोळ्यासमोर बिल भरण्यासाठी लागणारी रांग आठवली, रांगेत उभा राहून बिल भरायचं म्हंटल्यावर बाकीच्या रूममेटच्या तोंडावर वाजणारे बारा आठवले आणि निमूटपणे सर्वांचा ‘शेअर’ गोळा करून ऑनलाईन बिल भरून मोकळा झालो.

– प्रशांत शिंदे 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)