सफाई कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर डल्ला?

चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्‍ती : कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ; जामखेडकरांची अपेक्षा
जामखेड – चतुर्थश्रेणी व तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांचे 13 लाख रुपये बॅंकेतून परस्पर काढणारे कर्मचारी रमेश रोकडे व उमेश राऊत यांनी विड्रॉल स्लिपवर सह्या घेऊन परस्पर पैसे काढले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी कर्जत आणि जामखेड येथील उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. यामुळे यात मलिदा खाणाऱ्यांवर कारवाई होणार का? अशी अपेक्षा जामखेडकरांची आहे.
जामखेड नगरपालिकेच्या चतुर्थश्रेणीतील 120 कर्मचारी व 40 तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मिळालेल्या महागाई भत्त्याची रक्कम बॅंक खात्यात वर्ग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या कर्मचा-यांच्या खात्यातील प्रत्येकी 6 ते 15 हजार रुपये रक्कम काढल्याचा संदेश या कर्मचा-यांना मोबाइलद्वारे मिळाला.
अशाप्रकारे जवळपास 13 लाख रुपयांच्या रकमेस पाय फुटल्याचा प्रकार उघडकीस आला. ही रक्कम कर्मचा-यांच्या खात्यातून कोणी व कशी काढली? याचीच पालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
“तुम्ही या स्लिपवर सह्या करा, अन्यथा पैसे परत जातील,’ असे सांगितल्यामुळे कर्मचा-यांनी विड्रॉल स्लिपवर सह्या केल्या. कर्मचा-यांच्या महाराष्ट्र बॅंकेतील खात्यात 18 तारखेस प्रत्येकी 54 हजार रुपये जमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 120 कर्मचा-यांचे सहा हजार रुपये व 40 कर्मचा-यांच्या खात्यातील 15 हजार रुपये असे एकूण 13 लाख 20 हजार रुपये खात्यातून काढल्याचा संदेश संबंधित कर्मचाऱ्यांना प्राप्त झाला. हा संदेश मिळताच कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली.
जिव्हाळा फाउंडेशनने याबाबत जामखेड पोलीस स्टेशन कारवाई करत नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे निवेदन देऊन स्वतंत्र अधिकारी नेमून चौकशी करावी, दोषींवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
नितीन कापडणीस, जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.
या समितीला ज्या बॅंकेतून पैसे काढले तेथील अधिकाऱ्यांचे जबाब घ्यावेत. बॅंक व नगरपरिषद सीसीटीव्ही फुटेज व रेकॉर्ड, बॅंक स्टेटमेंट व नगरपालिका बॅंक खातेनिहाय सखोल चौकशी करून चौकशी अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता खरा साहेब कोण? हे उघड होईल.
शहराची स्वच्छता ठेवणाऱ्या सफाई कामगारांच्या महागाई भत्त्यावर डल्ला मारणारे नेमके कोण आहेत. विड्रॉल स्लिपवर सह्या घेणारे रमेश रोकडे व उमेश राऊत यांच्याबरोबर नेमके कोण कोण सहभागी आहेत? जामखेड पोलीस ठाण्यात नगरपरिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी 26 एप्रिल रोजी फिर्याद दाखल केली आहे.
एक महिना होत आला तरी अद्यापही पोलीस स्टेशनने कसलीही कारवाई केली नाही. या प्रकरणी ताबडतोब कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा जिव्हाळा फाउंडेशन, जामखेडच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनावर मधुकर राळेभात, सिद्धार्थ घायतडक, राम निकम, संतोष पवार, भानुदास बोराटे, गुलाब जांभळे, चंद्रकांत पवार, नामदेव राळेभात यांच्या सह्या आहेत.

अठरा महिन्यांचा महागाई भत्ता…
काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वीच्या जामखेड ग्रामपंचायतीचे 160 कर्मचारी नगरपालिकेत सामावून घेतल्यानंतर त्यांना सरकारकडून 18 महिन्यांच्या महागाई भत्ता फरकापोटी प्रत्येकी 54 हजार रुपये असे एकूण 86 लाख 40 हजार रुपये मिळाले. महिनाभरापूर्वी पालिकेच्या महाराष्ट्र बॅंकेतील खात्यात ही रक्कम जमा झाली. पालिकेने 18 एप्रिलला ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली. 18 एप्रिलला पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी दोनशेहून अधिक विड्रॉल स्लिप महाराष्ट्र बॅंकेतून आणल्या होत्या. 19 एप्रिलच्या पहाटे सहाच्या सुमारास दोन कर्मचाऱ्यांनी सफाई कामगारांना बोलावून “साहेबांनी तुम्हाला एवढे पैसे मिळवून दिले आहे. तुम्ही या स्लिपवर सह्या करा,’ असे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)