सप्तसुरांचा ताल छेडणारी साताऱ्याची “संगीत भिशी”

कायद्याचं बोला म्हणणाऱ्या वकील मंडळींचा अनोखा उपक्रम
संदीप राक्षे
सातारा, दि. 10
कोर्टाच्या दालनात दिवसभर कायद्याचं बोला म्हणणाऱ्या साताऱ्याच्या दर्दी वकील मंडळीनी चक्क ‘संगीत भिशी’ चा अभिनव प्रयोग राबवला आहे. महिन्यातून एक दिवस एक संकल्पना घेऊन त्यावर गाण्याची मैफल सजवण्याची अफलातून कल्पना या भिशीमध्ये आहे. मात्र या भिशीमध्ये पैशांची नाही तर चक्क सूरांची देवाणघेवाण आहे. कोर्ट रूम मध्ये कायद्याचा ड्रामा रंगवणारी वकील मंडळी चक्क सूरांची मैफल रंगवत असून त्यांच्या कलाप्रेमाचा हा नवीन पैलू समोर आला आहे.
ऍड माधुरी प्रभुणे व ऍड लक्ष्मीकांत अघोर यांच्या संकल्पनेतून या संगीत भिशीचा जन्म झाला. दिवसभर पक्षकारासाठी न्यायालयात कायद्याचा किस काढणारी ही मंडळी अतिशय दर्दी पध्दतीने जगतात आणि संगीत भिशीच्या मैफलीत रसरसून गाण्याचा आनंद घेतात. भिशी म्हणजे पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र जमणे. मात्र या वकील मंडळीच एकत्र येणं असते ते सुरांचे तराने छेडणे व त्यातून निर्माण होणाऱ्या निर्भेळ आनंदाची देवाणघेवाणं करणे. सहज सुचलं आणि ते अमलात आणलं ऍड. माधुरी प्रभुणे व ऍड. अगोर यांनी ही एक दिवस बोलता बोलता ही संकल्पना मांडली आणि त्यांच्या संगीतप्रेमी सहकाऱ्यांनी ही संकल्पना उचलून धरली. यामध्ये हेमंत प्रभुणे सौ. प्रिया अघोर, आशुतोष वाळिंबे ऍड. अमोल चिकणे ऍड. अर्चना काटकर, श्रीमती शुभदा शहाणे व ऍड. अमित दळवी या साऱ्यांनी च संगीत भिशीला चार चॉंद लावले. आत्तापर्यंत भिशीच्या चार मैफिली रंगल्या. कधी पसंतीची गाणी कधी फक्त भावगीतं कधी शास्त्रीय संगीत अशा प्रत्येक मैफलीतून भिशी व्यक्‍त होत राहते. येत्या 19 ऑगस्टला संगीत भिशी ‘श्रावणाची नवलाई ‘ घेऊन व्यक्त होणार आहे. हा सूरमयी नजराणा वेगवेगळ्या सूरांचा असतो. यामध्ये कसलेल्या गवय्याप्रमाणे वरचा’सा’ घेणारी अनेक मंडळी आहेत आणि स्वतः तला सूर शोधणारी हौशी वकील मंडळी आहेत. सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या चेंबरमध्ये कायद्याच्या कलमांवर चर्चा तर होतेय शिवाय सप्तसूरांचा ताल सांभाळण्याची कसरत ही तितक्‍याच लिलया पद्धतीने हाताळली जाते. संगीत भिशीचा हा उपक्रम साताऱ्यात गाजू लागला आहे. भिशीच्या निमित्ताने सर्वच वकील मंडळी एकमेकांशी एखाद्या कुटुंबाप्रमाणे जोडली गेली आहेत. गाण्याच्या मूडप्रमाणे आणि थीमप्रमाणे कराओके सिस्टिम तबला हार्मोनियम अशा विविध संगीत आयुधांचा जामानिमा सर्वांकडून मोठ्या उत्साहाने केला जातो. आधी संगीत भिशी ही संकल्पना यशस्वी होत आहे. त्यातून चांगल्या गाण्यांचा रियाज आणि त्याचा निर्भेळ आनंद हेच भिशीच्या वेगळेपणाचे गमक असल्याचे ऍड. लक्ष्मीकांत अघोर यांनी सांगितले.

संगीत भिशीच्या या कुटुंबात श्रीमती शुभदा शहाणे या सर्वात ज्येष्ठ आहेत. वयाची पासष्टी ओलांडलेल्या शहाणे ताईचा उत्साह एखाद्या तरुणीला लाजवेल असाचं असतो. संगीत मिशीत त्यांचा गाता गळा आहेच शिवाय त्या उत्तम हार्मोनियम वाजवतात. वय हा शहाणे शुभदा शहाणे यांच्यासाठी आकड्यांचा खेळ आहे पण संगीत भिशीतला हा खळाळणारा हा झरा सप्तसूरात अविरतपणे वहात राहतो.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)