शेती फारसं उत्पन्न देत नाही; पण आता पूर्व भागात फळबागा मूळ धरू लागल्या आहेत. या भागाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर अत्यंत महत्त्वाचा. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखीमार्ग याच भागातून जातो. पुसेगाव, गोंदवले, म्हसवड, शिखर शिंगणापूर, औंध ही तीर्थक्षेत्रे याच भागात आहेत. औंध हे पूर्वीचे संस्थान. तिथल्या यमाईदेवीच्या मंदिरासह ग्रामीण भागातील एकमेव समृद्ध संग्रहालय पर्यटकांना तोंडात बोट घालायला लावणारे.
शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत. पुसेगाव, म्हसवडच्या यात्रांना महाराष्ट्रासह परराज्यातील असंख्य भाविक हजेरी लावतात. ही बलस्थाने विचारात घेऊन पर्यटन विकासाची आखणी जाणीवपूर्वक केली जावी आणि या भागात रोजगारनिर्मिती व्हावी, अशी तरुणांची अपेक्षा आहे.
गुणग्राहकतेत मागे नाही.
वैविध्याने परिपूर्ण असलेला सातारा जिल्हा गुणग्राहकतेच्या बाबतीतही तसूभर मागे नाही. कुस्ती, कबड्डी या देशी खेळांमध्ये साताऱ्याच्या खेळाडूंनी जगात पताका फडकावली. बास्केटबॉल, नेमबाजीसारख्या खेळांमध्येही सातारा मागे नाही. मोहीची “सुपरफास्ट’ ललिता बाबर, नेमबाज शिवराज ससे यांच्यासारखे अनेक गुणी खेळाडू जिल्ह्याची शान वाढवीत आहेत. क्रीडा क्षेत्राबरोबरच कलेच्या प्रांतातही सातारकर आपले वेगळेपण टिकवून आहेत.
नितीन दीक्षित, सचिन मोटे, प्रताप गंगावणे, नीलेश भोसले यांच्यासारखे लेखक, किरण माने, बाळकृष्ण शिंदे, संतोष पाटील, मकरंद गोसावी, संदीप जंगम यांच्यासारखे अनेक गुणी अभिनेते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ चित्रपट आणि मालिकांच्या क्षेत्रात नावारूपाला आले आहेत. “पळशीची पीटी’ या कान महोत्सवासाठी नुकत्याच निवडल्या गेलेल्या मराठी चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया याच जिल्ह्यातली आणि कलावंत तंत्रज्ञही बहुतांश इथलेच.
लोककलेच्या प्रांतात महाराष्ट्र शाहीर साबळे, शाहीर निवृत्ती पवार यांनी जिल्ह्यात चांगलीच नांगरट करून ठेवली आहे आणि अनेक प्रतिभावंत शाहीर आजही लोकरंजनाचे व्रत जोपासत आहेत. राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा आणि खुल्या प्रयोगांद्वारे इथले असंख्य रंगकर्मी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून देत आहेत. अशा या बहुरंगी जिल्ह्याचा पोवाडा याच जिल्ह्यातील शाहीर थळेंद्र लोखंडे यांनी 1991 मध्ये लिहिला होता. या पोवाड्याचे शेवटचे चरण… साताऱ्याचे सप्तरंग मोजक्या शब्दांत मांडणारे…
ठेवली जपून रोशनबाईंनी ।
साताऱ्याची सोनलावणी ।
व्हाल वेडे पेढे खाऊनी ।
मारा पिंक जर्दा चावूनी ।
बघा साताऱ्याची ही तऱ्हा भेट देऊनी ।।
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा