सप्तरंगी सातारा (भाग- २ )

कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात सरासरी पाच हजार मिलीमीटर पाऊस वर्षाकाठी पडतो. कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाचे चार टप्पे असून, प्रत्येक टप्प्याने नवा इतिहास रचला. आशिया खंडातील पहिले “लेक टॅपिंग’ झाले ते कोयना जलाशयातच. आज कोयनेच्या परिसरातच सर्वाधिक संख्येने पवनचक्‍क्‍या असून, जलविद्युत निर्मितीबरोबरच पवनऊर्जाही हाच परिसर राज्याला देतो. याच कोयनेच्या जलाशयावर तरंगती सोलर पॅनेल उभारून सौरऊर्जा निर्मितीचेही उद्दिष्ट असून, ते पूर्ण झाल्यानंतर अपारंपरिक ऊर्जेचे ‘हब’ म्हणून हा परिसर आदर्शवत्‌ ठरेल. अर्थात, कोयनेने यशाच्या जितक्‍या कहाण्या लिहिल्या, तितक्‍याच वेदनादायी अशा विस्थापनाच्या कहाण्याही आहेत.

महाराष्ट्राच्या भरभराटीसाठी घरदार सोडणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसनाचे प्रश्‍न अद्याप कायम असून, पुनर्वसनाचा कायदा होण्यापूर्वी विस्थापित झालेल्या कुटुंबांनी आधी धरण आणि नंतर भूकंप, कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कारणामुळे सातत्याने यातना भोगल्या आहेत. या पहाडी सह्याद्रिपुत्रांच्या त्यागाची जाण तसेच परिस्थितीची खंत उभ्या महाराष्ट्राला आहे.

सप्तरंगी सातारा (भाग- १ )

नैसर्गिक संपत्ती

सातारा जिल्ह्याचा पश्‍चिम भाग नैसर्गिक साधनसंपत्तीने, डोंगरकड्यांनी आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला. वन्यजीव, पक्षी आणि उभयचर प्राण्यांच्या शेकडो प्रजातींना आश्रय देणाऱ्या समृद्ध कोयना परिसराबरोबरच महाबळेश्‍वर, पाचगणी ही पर्यटकांची लाडकी ठिकाणे याच पश्‍चिम भागात वसलेली. छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श लाभलेले अनेक गडकिल्ले याच भागात दिमाखात उभे आहेत. जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळालेले कासचे पुष्पपठार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे.

कृष्णा, कोयना आणि वेण्णा तसेच त्यांच्या उपनद्यांवरची छोटी-मोठी धरणे शेती समृद्ध करणारी. याच पश्‍चिम पट्ट्यात सहकारी साखर कारखानदारी रुजली आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहराच बदलून गेला. इथल्या मेहनती शेतकऱ्याने शेतीला अनेक व्यवसायांची जोड देऊन हिकमतीने परिस्थिती बदलली. सरकारी धोरणे आणि योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेत कुटुंब समृद्ध केलं.

आज याच भागातला शेतकरी कृषी पर्यटनासारख्या अनोख्या व्यवसायाकडे वळत असून, महानगरांच्या प्रदूषणात घुसमटलेल्या लोकांचे आदरातिथ्य करून चांगली कमाईही करू लागला आहे. पर्यटन हा एकंदरीतच जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील एक प्रमुख व्यवसाय बनला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सान्निध्य लाभूनही जिल्ह्यात कारखानदारी, विशेषतः मोठे प्रकल्प फारसे दिसत नसले तरी निसर्गाची समृद्धी पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या घराकडे वळविण्याची हातोटी इथल्या उमद्या तरुणांनी साधली आहे.

सप्तरंगी सातारा (भाग- ३ )

याच निसर्गमायेचा लाभ घेऊन वनशेती, औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवड तसेच वनाधारित अन्य छोटे उद्योग सुरू करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण आणि मदतीची गरज आहे. घराजवळ रोजगार उपलब्ध झाला तर माथाडी कामगार म्हणून मुंबईला जाणारे शेकडो तरुण गावातच आपले भवितव्य घडवू शकतील आणि निसर्गपूरक विकासाचा आदर्श निर्माण करू शकतील.

पूर्व आणि पश्‍चिम हीच जिल्ह्याची खरी नैसर्गिक, भौगोलिक विभागणी. बरोबर मधून गेलेला राष्ट्रीय महामार्ग. पश्‍चिम भाग मुसळधार पावसाचा तर पूर्व भाग शुष्क, कोरडा. पश्‍चिम भाग डोंगरांचा तर पूर्व भाग माळरानांचा. जिल्ह्याच्या विकासाचे आराखडे तयार करताना ही विभागणी लक्षात घेऊन पूर्व भागात कारखानदारी आणि पश्‍चिम भागात निसर्गपूरक व्यवसायांना चालना मिळेल, असे नियोजन करावे ही तज्ज्ञांची रास्त अपेक्षा.

पूर्व भागात लोणंद, खंडाळा, शिरवळ या त्रिकोणात कारखानदारी बहरते आहे. अनेक देशी-विदेशी उद्योग शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. फलटण, खंडाळा, कोरेगाव, खटाव आणि माण या तालुक्‍यांमध्ये अवर्षणाची समस्या जाणवते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)