सप्तरंगी सातारा (भाग- १ )

ऐतिहासिक सातारा जिल्ह्याची भौगोलिक रचनाही वैविध्यपूर्ण असून, राजकारण, समाजकारण, शिक्षण, कला, क्रीडा या सर्वच क्षेत्रांमध्ये साताऱ्याचे योगदान मोठे आहे. नैसर्गिकदृष्ट्या विविधता जपणारा हा जिल्हा राज्याला आणि देशाला दिशा देणाऱ्या नेत्यांपासून संत, विचारवंत, लेखक, शाहीर, कलावंत, क्रीडापटूंची कर्मभूमी ठरला. औद्योगिक विकासाच्या मार्गावर तुलनेने थोडा पिछाडीवर राहिलेला हा जिल्हा असला, तरी नैसर्गिक विविधतेचा लाभ घेऊन विकासाचे नियोजन केल्यास गतिमान आणि निसर्गपूरक विकासाचा आदर्श उभा करण्याची क्षमता या मातीत आहे.

-Ads-

 

क्रांतिकारकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्याला समृद्ध ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आणि वैविध्यपूर्ण भौगोलिक रचना लाभलेली आहे. राज्याच्या पश्‍चिमेला, सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेल्या या जिल्ह्याने निसर्गदत्त खजिन्यापासून कणखर नेतृत्वापर्यंत अनेक देणग्या राज्याला आणि देशाला दिल्या. प्रतिसरकार स्थापून ब्रिटिशांना शह देणाऱ्या क्रांतिसिंहांच्या साताऱ्याने “आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ मानले गेलेले यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे थोर सुपुत्र देशाला दिले.

किसन वीरांसारखे क्रांतिकारक, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ईबीसी शिष्यवृत्तीचा निर्णय घेणारे द्रष्टे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यासारखी असंख्य नररत्ने दिली. इतिहासात डोकावले तरी साताऱ्याच्या मातीने देशाला किती समृद्ध केले, याची ओळख पटते. विवेकाची शिकवण देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींची ही कर्मभूमी. आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच जीवन कसे जगावे हे रामदास स्वामींनी मराठी माणसाला सांगितले. “”खुनाच्या गुन्ह्याला देहान्त प्रायश्‍चित्ताशिवाय दुसरे प्रायश्‍चित्त नाही,” हे थेट रघुनाथराव पेशव्यांना खडसावून सांगणारे न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे साताऱ्याच्याच मातीतले.

सप्तरंगी सातारा (भाग- २ )

दगडविटांचा आणि शेणाचा मारा झेलून मुलींसाठी पहिली शाळा चालविणाऱ्या आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे जन्मगाव याच जिल्ह्यातले. “मेरी झॉंसी नहीं दूंगी,’ म्हणत बलाढ्य ब्रिटिशांशी दोन हात करणाऱ्या राणी लक्ष्मीबाईचे माहेर याच जिल्ह्यातले. आज जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्‍वर थंड हवेचे ठिकाण म्हणून स्थापित करण्यासाठी प्रयत्न आणि सातारा-महाबळेश्‍वर रस्त्याची निर्मिती केली ती साताऱ्याच्याच श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी.

अर्थकारणात ठसा उमटवणारे विमामहर्षी अण्णासाहेब चिरमुले आणि गरिबाघरच्या लेकरांना खांद्यावर घेऊन शाळेत आणणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे तपस्वी याच मातीतले. समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या द्रष्ट्यांची ही परंपरा, अंधश्रद्धेच्या जोखडातून लोकांना मुक्त करण्याच्या मार्गात प्राणाहुती देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, समाजाला सजग करणारे विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे आदींनी कायम राखली.

सुजलाम्‌ सुफलाम्‌ परिसर क्षेत्र महाबळेश्‍वरला उगम पावलेल्या पंचनद्यांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधला मोठा परिसर सुजलाम्‌ सुफलाम्‌ केला आहे. कृष्णा, वेण्णा आणि कोयना या पूर्ववाहिनी तर गायत्री आणि सावित्री या पश्‍चिमवाहिनी नद्यांचा उगम महाबळेश्‍वरच्या डोंगरकुशीत झाला. कृष्णेकाठच्या सुपीक काळ्या मातीने लक्षावधी लोकांना सोन्याचा घास भरवला. कोयना ही तर “महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ म्हणून नावारूपाला आली. पश्‍चिमेकडच्या दुर्गम प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीचा लाभ घेत कोयना नदीवर 103.02 मीटर उंचीचे, 807.72 मीटर लांबीचे धरण उभारण्याचे काम 1954 मध्ये हाती घेण्यात आले.

सप्तरंगी सातारा (भाग- ३ )

या धरणामुळे तयार झालेल्या शिवसागर जलाशयाने बारा हजार हेक्‍टरपेक्षा अधिक शेती ओलिताखाली आणलीच; शिवाय महाराष्ट्राची विजेची गरज पूर्ण केली आणि या राज्यात कारखानदारीची भरभराट झाली.

राजीव मुळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)