सप्टेंबरमध्ये शेअर निर्देशांक कोसळला 6.26 टक्‍क्‍यांनी 

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून काढता पाय 
मुंबई: सप्टेंबर हा महिना शेअरबाजारासाठी अत्यंत खराब गेला आहे. या महिन्यात मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 2417 अंकानी म्हणजे 6.26 अंकानी कमी झाला आहे. त्याचबरोबर सरलेल्या आठवड्यातही शेअरबाजार निर्देशांक कमी झाले. आगामी आठवड्यातही गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्‍यता आहे.
रिझर्व्ह बॅंकेने काही बॅंकांवर कारवाई केली आहे. त्याचबरोबर पुढील आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. या घडामोडीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.
भांडवल सुलभतेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने 10 हजार कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले आहेत. त्याचबरोबर बॅंकेने सीआरआरच्या दरात कपात करण्याच्या शक्‍यतेवर विचार करण्याचे सरकारने सुचविले आहे. भांडवल सुलभता वाढविण्यासाठी बॅंक काय करते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर क्रुडचे दर 80 डॉलरच्या पुढे गेले आहेत. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे साहजिक आहे. या बाबीच्या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंक यावेळी व्याजदरात पाव टक्‍के वाढ करण्याच्या शक्‍यतेवर विचार करू शकते असे बोलले जात आहे.
सरलेल्या आठवड्यात मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 614 अंकानी म्हणजे 1.67 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 36227 अंकावर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 212 अंकांनी कमी होऊन 10930 अंकावर बंद झाला. देशातील आणि परदेशातील नकारात्मक घडामोडीमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 3713 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी तब्बल 8707 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी करून
निर्देशांकांना आधार देण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही निर्देशांक कमी झाले.
जागतिक बाजारात क्रुडचे दर कमी होण्याची शक्‍यता मावळत आहे. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य स्थिर होताना दिसत नाही. या कारणामुळे गुंतवणूकदार खरेदी करण्यास धजावत नसल्याचे चित्र बाजारात आहे. गेल्या चार आठवड्यापासून निर्देशांक कमी होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना निर्देशांकांचा तळ नेमका कुठे आहे, याचा अंदाज यायला तयार नसल्याचे वातावरण बाजारात आहे.
जिओजी वित्तीय सेवा या कंपनीचे मुख्य संशोधन अधिकारी विनोद नायर म्हणाले की, गुंतवणूकदारांना निर्देशांक कोणत्या पातळीवर स्थिरावणार याचा अंदाज लागणे कठीण झाले आहे. भांडवल सुलभतेचा प्रश्‍न कसा सुटणार आहे, याची खात्री वाटणाऱ्या घडामोडी दिसत नाहीत. त्यामुळे एक तर गुंतवणूकदार विक्री करीत आहेत किंवा कुंपणावर बसून आहेत. बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)