सदोष गतीरोधकांमुळे रस्ते बनलेत अपघाती

– “आयआरसी’चे नियम धाब्यावर
– गतीरोधकांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था

पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील गतीरोधकांची दुरावस्था झाली आहे. तसेच, बहुतांश गतीरोधक इंडियन रोड कॉंग्रेस (आयआरसी) नियमानुसार नसल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. गतीरोधक नियमानुसार नसल्याने रस्ते अपघाती झाले आहेत.

प्रशासनाने शासकीय मानकानुसार गतीरोधक बनविणे आवश्‍यक आहे. मात्र, शहरातील कित्येक गतीरोधक परवानगी न घेता टाकले जात असल्याने त्या ठिकाणी सतत लहान-मोठे अपघात होतात. तसेच, नियमानुसार गतीरोधक नसल्याने अनेक वाहनांचा खालचा भाग घासत असल्याने वाहनांचे नुकसान होऊन नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आयआरसी नियमानुसार मुख्य रस्त्याला गतीरोधक टाकता येत नसून अंतर्गत रस्त्यावर बनविण्यास परवानगी आहे. मात्र, प्रशासन नियमानुसार गतीरोधक तयार करत नसल्याने कित्येक वाहन चालकांचे अपघात होऊन बळी गेलेले आहेत.

शहराच्या काही भागात नव्याने “रबरल’ गतीरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र, या प्रकारचे गतीरोधक काही कालावधीनंतर उखडले जाऊन त्यातील खिळे वाहनांना धोकादायक ठरतात. शहरातील मुख्य मार्गावरील मोठमोठ्या चौकात सिग्नलच्या मध्यभागी गतीरोधक असून या ठिकाणी असलेले “झेंब्रा क्रॉसिंग’चे पांढरे पट्टे पुसट झालेले आहेत. यामुळे, वाहन चालकांना वाहने उभी करण्याचा अंदाज येत नसल्याने कित्येकजण चौकाच्या मध्यभागी वाहने उभी करतात. याचा परिणाम म्हणून वाहतूक पोलिसांकडून नियमाचे उल्लंघन केले म्हणून दंड वसूल केला जातो.

प्रशासनाने रस्ते वाहतूक मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या नियमानुसार गतीरोधक बनविणे आवश्‍यक असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात बहुतांशी गतीरोधक अनधिकृतपणे बनविण्यात आले आहेत. आयआरसी नियमानुसार राज्यातील ज्या शहरात गतीरोधक बनविण्यात आले आहेत, असे गतीरोधक 2005 साली काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर, या निर्णयाची अंमलबजावणी 2007 पर्यत करण्यात आली. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून पुन्हा “मागचे दिवस पुढे’ अशी स्थिती झाली आहे.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरी मंच.

गतीरोधक बनविण्याचे “आयआरसी’चे नियम
– गतीरोधकाच्या अलीकडे 40 फूट अंतरावर सूचना फलक लावावा
– गतीरोधक 13 फूट रुंद व 3.5 मीटर लांबी पाहिजे
– गतीरोधकावर पांढरे आणि काळ्या रंगाचे पट्टे मारले पाहिजेत
– बुध्दीबळाच्या पटाप्रमाणे पांढऱ्या रंगात चौकटी आवश्‍यक आहेत
– गतीरोधकाच्या वरील भाग सपाट पाहिजे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)