सदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग १)

एरव्ही सदाशिव पेठेत पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धेच्या निकालाच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त… स्पर्धेचा निकाल जाहीर होऊ लागला की ढोल- ताशांच्या निनादात विजेत्या संघाचा जल्लोष असं वातावरण असायचं. सहभागी संघांच्या आपसात कुरबुरी व्हायच्या. कित्येकदा लाठीमार करावा लागतो. मात्र, यंदा यापैकी काहीच घडलं नाही. निकाल जाहीर होऊ लागला तसतसा एकेक संघानं तेथून काढता पाय घ्यायला सुरुवात केली. त्या संध्याकाळी सदाशिव पेठेत घुमत राहिला तो फक्त नगरी “माईक’चा बुलंद आवाज.

पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धेत न्यू आर्टस्‌ ऍण्ड कॉमर्सच्या संघानं जेतेपद पटकावलं याचा नगरकरांना मोठा आनंद झाला. त्याचं कारण 37 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नगरच्या संघाला जेतेपदाचा मान मिळाला. गुण्यागोविंदानं नांदणारं एक गाव. गावातील सर्व जाणत्या मंडळीनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून सर्वसामान्यांचे एक निकोप व्यासपीठ गावाच्या माध्यमातून उभे केले जाते. अर्थात, अनेक राज्यांनी मिळून बनणाऱ्या संघ राज्याचं ते प्रतीकच. मात्र, राजकारणी व्यक्तींचा त्यात शिरकाव होतो. नेतृत्वाचे प्रतीक असलेला माईक या राजकारण्यांच्या हातात जातो आणि हळूहळू सर्वसामान्यांचा आवाज नाहिसा होतो आणि उभ्या राहतात पुन्हा जातीभेदांच्या भिंती. एकोप्यात जगणारा समाज पुन्हा तुकड्या तुकड्यात विखुरला जातो. अखेर परिस्थितीनुरूप पुन्हा माईक सर्वसामान्यांच्या हातात येतो. पुन्हा एकोप्याच्या माईकचा आवाज बुलंद होतो.

“माईक’ या एकांकिकेचे लेखन संदीप दंडवते यांनी केले असून, प्राथमिक फेरीतील 51 एकांकिकांमधून पहिल्या नऊ एकांकिकांमध्ये “माईक’ आली. त्यानंतर दिग्दर्शक कृष्णा वाळके आणि त्यांच्या चमूचा आत्मविश्‍वास दुणावला, अर्थात 13 जणांच्या या चमूला आपणच जिंकू, असा आत्मविश्‍वास सुरुवातीपासूनच होता. मात्र, न्यू आर्टस्‌ ऍण्ड कॉमर्सच्या संघाने 15 वर्षांनंतर या स्पर्धेत पुन्हा सहभाग नोंदवला हे नमूद केले पाहिजे.

पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धा ही राज्यस्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. नगरच्या संघाचा सहभागही यात फार पूर्वीपासूनच असायचा. नगरची नाट्य चळवळच मुळात प्रायोगिक रंगभूमीपासून सुरू झाली असल्याने या स्पर्धेला अपेक्षित विषय आणि त्याचं प्रायोगिक सादरीकरण केलं जायचं. सत्तरीच्या दशकात दोन वेळा नगरच्या संघांनी या स्पर्धेचे जेतेपद पटकावलं. त्यात 1978 साली आयुर्वेदच्या उल्हास कुलकर्णी, उमा राजपूत यांनी “कळकीचं बाळ’ ही एकांकिका सादर करून जेतेपद पटकावलं. त्यानंतर दोनच वर्षांनी विजय दळवी यांच्या लॉ कॉलेजच्या चमूने “साली मैत’ या एकांकिकेच्या माध्यमातून या करंडकावर आपलं नाव कोरलं. अर्थात, यानंतरही नगरचा कोणता ना कोणता संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचत राहिला. अय्युब खान यांच्या “चमूने होडी’, “मी उभा केव्हाचा’, नितीन लचके आणि श्रीधर फडके यांची “फेब्रुवारी’, राम धुमणे, संजय आढाव अभिनित “मदारी’ अशा अनेक एकांकिकांचे सादरीकरण पुरुषोत्तमच्या अंतिम फेरीत सादर झाली. त्यात त्यांना बक्षीसंही मिळाली.

मात्र, जेतेपदापासून नगरची नाट्य चळवळ तब्बल 37 वर्षे लांब राहिली. मात्र, न्यू आर्टस्‌च्या चमूने या स्पर्धेत यश मिळवून यापुढील वाटचालीसाठी आशा पल्लवित केल्या आहेत. पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत ज्या दोन एकांकिका दाखल झाल्या त्यापैकी “माईक’ या एकांकिकेने विजेतेपद पटकावलं, तर पेमराज सारडाच्या संघाकडून “ड्रायव्हर’ ही अमोल साळवे लिखित विनोद गरुड दिग्दर्शित एकांकिकेचेही उत्तम सादरीकरण झाले. पुरुषोत्तम करंडकाच्या निमित्ताने नगरमधील नाट्य संघांनी अपार कष्ट घेतल्याचं दिसतं.

सुरुवातीला एकांकिका उभी करताना अडथळे पार करताना या संघांची चांगली दमछाक झाली. मात्र, न्यू आर्टस्‌च्या संघाला महाविद्यालयानं अपेक्षित आर्थिक रसद पुरविली. विद्यालयाचे प्राचार्य झावरे सर आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख एठेकर यांनी सहकार्य केल्यामुळे या नाट्य संघांचे अडथळे कमी झाले. तीच बाब पेमराज सारडा महाविद्यालयाच्या संघाबाबतही म्हणता येईल. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत मिळालेल्या बावनकशी यशामुळे नाट्य क्षेत्रातल्या अन्य संधी खुल्या झाल्या असून, जागतिक मराठी संमेलनातही एकांकिका सादर करण्याची संधी मिळाली. तर, सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने एकांकिका महोत्सवाच्या निमित्ताने 10 ते 16 मार्च संपूर्ण महाराष्ट्रात ही एकांकिका प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

देविप्रसाद अय्यंगार

 मुख्य वार्ताहर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)