– सागर येवले

पुणे – जिल्ह्यातील विकासकामांना गती कशी मिळेल, अधिकाऱ्यांकडून वेळेत आणि दर्जेदार काम कसे करून घेता येईल यासह शेतकरी, महिला, तरूण मुले-मुली, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि आपल्या गाव, वाड्या वस्त्यांवरील समस्या, अडी-अडचणी सोडविण्यासाठी ज्या सभागृहात पोटतिडकीने बोलणे आवश्‍यक आहे. त्या सभागृहात ज्यावेळी अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून सदस्यांमध्येच “जुपते’ त्यावेळी सभागृहाला ते अशोभनीय आहे. जिल्हा परिषदेच्या बुधवारी (दि. 11) झालेल्या सर्वसाधारण सभेला अधिकऱ्यांच्या “म्युचल’ बदलीवरून सदस्यांमध्ये “चढाओढ’ झाली आणि नक्‍की सदस्य कोणासाठी एवढ्या पोटतिडकीने बोलतात असा प्रश्‍न उपस्थित झाला.

जिल्हा परिषद आणि राज्य शासनाकडून येणाऱ्या योजना आणि विविध कामांची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्याची (बीडीओ) असते. त्यामुळे गटविकास अधिकारी हा तालुक्‍याचा “मॉनिटर’ असतो. तालुक्‍याच्या ठिकाणी काम करत असताना, संबंधीत अधिकाऱ्याचे काम सर्वांनाच आवडते, असे नसते. थोडेफार मतदभेद असतात. त्यामध्ये सर्वांना सामावून घेऊन विकासकामे करून घेणे ही त्या अधिकाऱ्याची कसब असते. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एका सदस्यांनी त्यांच्या तालुक्‍यातील बीडीओच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्‍त केले. बदलीचे अधिकार नसतानाही बदल्या केल्याचे सदस्याने सांगितले. त्यावरून सभागृहात काही सदस्यांमध्ये उलटसुलट चर्चा झाली. अखेर दोन तालुक्‍यातील बीडीओंची “म्युचल’ पध्दतीने बदली करावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली.

साहजिकच संबंधित सदस्यांनी तालुक्‍याचा विकासाच्या दृष्टीनेच ही मागणी केली असेल, मात्र त्याचवेळी दुसरे सदस्य त्याला विरोध करतात आणि त्यावरून सदस्यांमध्ये जुपते, त्यावेळी सभागृहाला हे अशोभनीय आहे. सभागृहात अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून सदस्यांनी काय भांडायची गरज आहे. ते प्रशासन बघून घेईल, उगाच सभागृहाचा वेळ जातो, अशी प्रतिक्रिया काही सदस्यांनी यावेळी दबक्‍या आवाजात दिली. त्याचवेळी जिल्हा परिषद अध्यक्षांनी “प्रत्येक सदस्यांनी पक्षाचे जोडे बाहेर काढून सभागृहात यायचे’ याठिकाणी आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत, असे सांगत सदस्यांचा गोंधळ शांत करण्यासाठी यापुढे सर्व बीडीओंना बदलीचे अधिकार देऊ नका, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अध्यक्षांनी केली. त्यावेळी काही सदस्यांनी त्याला विरोध करत, ज्या तालुक्‍यातील बीडीओचा विषय आहे. तेवढ्यापुरताच तो असावा. उगाच अन्य अधिकाऱ्यांचा यामध्ये विषय होवू नये, अशी मागणी पोटतिडकिने करण्यात आली. त्यामुळे सदस्यांच्या मनामध्ये विकासाची भावना असली तरीही, सभागृहात अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि अधिकारांवर सदस्यांमध्ये होणारी “चढाओढ’ ही सदस्यांना आणि सभागृहाला शोभणारी नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)