सदस्यांच्या अनुपस्थितीने भाजप पुन्हा तोंडघशी

ठराव नामंजूर : मनसेचा विरोध


शिवसेनेची साथ, दोन्ही कॉंग्रेस तटस्थ


पुणे : एकहाती सत्ता असलेल्या भाजपचे सदस्य मतदानवेळी अनुपस्थितीत राहिल्याने भाजप सदस्याने दिलेला प्रस्ताव नामंजूर होण्याची वेळ मंगळवारी झालेल्या सभेत भाजपवर ओढावली. या ठरावासाठी शिवसेनेने भाजपला साथ दिली. तर या ठरावास मनसेने विरोध केला. मात्र, आयत्यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. हद्दीजवळील काही गावांमध्ये सांडपाणी जलवाहिनी टाकण्याचा हा 10 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव होता. मात्र, या नामुष्कीमुळे भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी सभाच तहकूब करत नाराजी व्यक्त केली.

 

मोरे-भिमाले यांच्यात जुंपली
सत्ताधारी असूनही केवळ सदस्य उपस्थित नसल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाल्याने सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची आणि या प्रस्तावास विरोध करणारे मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी या दोन्ही सदस्यांनी एकमेकांवर जोरदार तोंडसुख घेतले. त्यानंतर विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी मध्यस्थी करत या दोन्ही नेत्यांना शांत केले. मात्र, काही वेळाने पुन्हा हे दोन्ही नेते एकमेकांच्या दिशेने धावून गेले होते. त्यामुळे काही काळ सभागृहात चांगलाच गोंधळ झाला.

-Ads-

 

कात्रज येथील पेशवेकालीन तलावात मांगडेवाडी, गुजरवाडी, निंबाळकरवाडी आणि भिलारेवाडी या गावांचे सांडपाणी ओढ्याद्वारे पेशवेकालीन तलावात येत असल्याने त्या भागातील नगरसेवक मनीषा कदम, प्रकाश कदम यांच्यासह इतर काही नगरसेवकांनी महापालिकेने या हद्दीत सांडपाणीवाहिनी टाकण्यासाठी पत्र दिले होते. त्यानंतर या भागात सांडपाणी जलवाहिनी टाकण्याच्या सूचना स्थानिक आमदार आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिकेला दिल्या. त्यानुसार, स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर तो मुख्यसभेसमोर चर्चेला आला. यावेळी या प्रस्तावास मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी विरोध करत चुकीच्या पध्दतीने हे काम होत असल्याची टीका केली. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे आणि भैय्यासाहेब जाधव यांनी या प्रस्तावाला उपसूचना देत या निधीतूनच मांजरी आणि शेवाळेवाडी गावांसाठीही सांडपाणीवाहिनी टाकण्याची मागणी केली. मात्र, भाजपने त्यास नकार दिला. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीला उपसूचना मागे घेण्यास सांगण्यात आले. राष्ट्रवादीनेही त्यास संमती दिली. त्यानंतर हा विषय पुकारताच मोरे यांनी त्यास विरोध केला. त्यावेळी झालेल्या मतदानात भाजप आणि शिवसेना एकत्र आले. त्यांची 74 मते, तर मोरे यांनी विरोध केल्याने 1 विरोधात 74 मतांनी प्रस्ताव मंजूर अशी घोषणा केली.

प्रस्ताव मंजूर, पण…!
मतदानानंतर नगरसचिव सुनील पारखी प्रस्ताव मंजूर पण…! म्हणताच, सभागृहात एकच शांतता पसरली हा प्रस्ताव मंजूर झाला असला, तरी तो तांत्रिकदृष्टया नामंजूर असल्याची घोषणाच पारखी यांनी केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला. प्रत्यक्षात हे काम हद्दीबाहेर करण्यात येणार होते. त्यामुळे धिनियम 89 नुसार, सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 50 टक्के सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करणे आवश्‍यक होते. त्यामुळे महापालिकेतील 162 मधील एका नगरसेविकेचे निधन झाल्याने, तसेच एका नगरसेविकेस मतदानाचा अधिकार नसल्याने 160 पैकी 81 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान करणे आवश्‍यक होते. मात्र, प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेनेचे मिळून 74 सदस्यांनी ठरावास पाठिंबा दिला. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे भाजपला हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अवघी 7 मते कमी पडली. तर प्रत्यक्षात भाजपचे तब्बल 20 हून अधिक सदस्य सभागृहात उपस्थित नसल्याने सत्ताधारी भाजपला आपलाच प्रस्ताव नामंजूर होताना पाहण्याची वेळ आली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)