‘सत्‌-असत्‌’

माकडचेष्टा…

इतके दिवस आम्ही माकड हाच माणसाचा पूर्वज आहे असे समजत होतो. माणसालाही आधी माकडाप्रमाणे शेपटी होती; मात्र, मानवाची उत्क्रांती होत असताना ही शेपटी हळहळू गळून पडली आणि माकडाचा माणूस झाला असे मानले जात होते. चार्ल्स डार्विन नामक एका शास्त्रज्ञाने म्हणे तसा मानवाच्या उत्क्रांतीचा शोध लावला होता. त्यामुळे लहानपणी कधीकाळी माकडाचे दर्शन झालेच तर ‘माकडा, माकडा, तुझ्या शेपटीला शेरभर तूप …. ‘ असे ओरडत त्याच्या मागे लागत असू. आणि बिचारे तेही माणसाळल्यागत आम्हाला पाहून ‘माकडचेष्टा’ करीत असे.

-Ads-

माकड म्हटले की, आम्हाला आमच्या लहानपणची एक गोष्ट हमखास आठवते. आमच्या आजोबांच्या घरी ठराविक महिन्यात काही भिक्षेकरी लांबून यायचे आणि काही दिवस मुक्‍काम करून जायचे. त्यातील एका भिक्षेकऱ्याचा चेहरा हुबेहूब माकडासारखा होता. त्यातच आमच्या थापेबाज मामाने, “त्याला शेपटीही आहे बरं का! मात्र ती त्याच्या धोतऱ्याच्या आत तो गुंडाळून ठेवतो,’ असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही अनेकदा उत्सुकतेपोटी तो धोतर नेसताना त्याच्यासमोरून जात असू मात्र आम्हाला कधी त्याच्या शेपटीचे दर्शन झाले नाही. (मामा मात्र थापेबाज आहे यावर शिक्कामोर्तब झाले) सांगायचा मुद्दा हा की अशासारख्या माणसांना बघून आमची लहानपणापासून पक्‍की खात्री झाली होती की, माकड हाच माणसाचा पूर्वज आहे.

मात्र, नुकतेच आपले केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी डार्विनचा, माकड हाच माणसाचा पूर्वज असल्याचा सिद्धांत चुकीचा असल्याचे सांगितले. कारण वेद किंवा उपनिषदात तसा कोठेच उल्लेख नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या या विधानामुळे डार्विनचा सिद्धांत मानणाऱ्या अनेकांनी लगेच जागीच ‘माकडउड्या’ मारून त्यांचा निषेध करायला सुरुवात केली. त्यांच्या खात्याचे प्रमुख्य मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही म्हणे, अशा ‘माकडचेष्टा’ करताना खबरदारी घ्या अशी त्यांना तंबी दिली म्हणे.

आता खरे तर सत्यपाल सिंह हे पूर्वी पोलीस खात्यात होते. पोलीस खात्यातील अनेक वरिष्ठ पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यावेळी त्यांना गुन्हेगारांनी केलेल्या अनेक ‘माकडचेष्टा’ दिसल्या नसतील का बरे? मानवाने कितीही प्रगती केली असली तरी अनेक माणसे आजही ‘माकडा’सारखीच वागतात हे त्यांना कळत नसेल का? उलट ‘माकड हाच आपला पूर्वज आहे’ असे समजून त्याप्रमाणेच वागणारी बरीच माणसे आपण आजूबाजूला पाहतो. त्यासंबंधीची उदाहरणे द्यायची असतील तर ती कितीतरी आहेत.

….पाठीमागून धावती ट्रेन येत असताना तिच्यासमोर येऊन ‘सेल्फी’ काढणे, प्लॅटफॉर्मवरून माकडउड्या मारीत धावती लोकल ट्रेन पकडणे, पिकनिकला गेले असताना ‘माकडचाळे’ करीत धिंगाणा घालणे, ‘पोलीसमामा’ काय करतो ते बघू तरी असे म्हणून त्याची गम्मत करण्यासाठी वाहतुकीचे नियम तोडणे, अनेकांच्या दाढीला ‘तूप’ लावून त्यांची फसवणूक करणे. आणि राजकारणात तर विचारूच नका, माकडे जशी या झाडावरून त्या झाडावर अगदी सहजपणे उड्या मारतात अगदी तसेच प्रत्येक निवडणुकीत ‘खुर्ची’साठी या पक्षातून त्या पक्षातून अगदी सहजपणे उड्या मारणारी अनेक राजकीय मंडळी आहेत. आणि हो, केवळ आपणास प्रसिद्धी मिळावी याच हेतूने ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ या उक्तीप्रमाणे काहीही विधाने करणे या साऱ्या त्यांच्या ‘माकडचेष्टा’च असतात ना.

… तेंव्हा माणसांच्या या साऱ्या ‘माकडचेष्टा’ पाहून माकड हाच माणसाचा पूर्वज आहे, यावरच कोणाचाही अगदी सहज विश्वास बसतो. माकडेही या ‘मानवलीला’ पाहून त्याचा मूळ आधार आपल्या ‘मर्कटलीला’ मध्ये आहे हे पाहून आनंदीत होत असतील. कदाचित डार्विन हा द्रष्टा संशोधक असल्यामुळे त्याला माणसांच्या या ‘माकडचेष्टांचा’ आधीच अंदाज असेल आणि म्हणूनच त्याने उत्क्रांतीपूर्वीचा आणि उत्क्रांतीनंतरचाही अभ्यास करून ‘माणसाचा पूर्वज माकड आहे’ असा शोध लावला असेल. त्यामुळे सत्यपाल सिंह, निदान वर्तमानकाळातील माणसाच्या ‘माकडचेष्टा’ पाहून तरी तुम्हाला त्या डार्विनच्या या सिद्धांतावर विश्वास ठेवावाच लागेल.

– सत्यश्री

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)