सत्यशील शेरकरांसह 87 जणांना अटक, सुटका

माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यास विरोध : पोलीस बंदोबस्तात सोडले पाणी

निवृत्तीनगर- माणिकडोह (ता. जुन्नर) येथील शहाजी सागर जलाशयातून पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यासह 87 जणांना जुन्नर पोलिसांनी धरणाच्या

गेटवरच ताब्यात घेतले नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यास कुकडी नदीकाठच्या 22 गावांतील स्थानिक शेतकऱ्यांचा कडाडून विरोध असल्याने आज (शनिवाई) येथील पाणीप्रश्‍न चिघळला आहे. यावर्षी माणिकडोह 72 टक्के भरले सध्या दहा टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे व अजून उन्हाळ्याचे तीन महिने जायचे आहेत. पहिल्या जंबो आवर्तनात जवळपास 52 टक्के पाणी सोडल्यात आले असून आता पाणी सोडले तर ऐन उन्हाळ्यात पिके जळून जातील तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होईल अशी भीती व्यक्‍त केली जात आहे. शेतकऱ्यांना पुढील 3 महिने पिण्याचे पाण्याच्या बरोबरच चाऱ्याच्या पाण्याच्या सुद्धा नियोजन करावे लागणार आहे. शेतीमालाला बाजारभाव नाही त्यातच हातातोंडाशी आलेल्या पिकांना पाणी नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कुकडी पाटबंधारे विभागाने यापुढील काळात जुन्नर शहर व लगतच्या 22 गावांच्या शेतकऱ्यांचा विचार करून पाणी राखीव ठेवावे, अशी मागणी होत होती. मात्र, प्रशासनाने आज पहाटे तीन वाजता कडक पोलीस बंदोबस्तात 1300 क्‍युसेकने नदीपात्रात पाणी सोडले आहे.

दरम्यान, शनिवारी (दि. 30) श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना माणिकडोहचे सोडण्यात येणारे पाणी अडविण्यास विरोध करू नये, आंदोलनाचा पवित्रा घेऊ नये म्हणून पोलिसांनी नोटीस दिली होती. शेरकर यांना यासंदर्भात नोटीस आल्याने शिरोली बुद्रुक येथे आज सकाळी 10 वाजता सोसायटीच्या परिसरात शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव जमला व त्याने धरणाकडे कुच केली. हा ताफा धरणा जवळ पोहोचताच जुन्नर पोलिसांनी शेरकर यांच्यासह 87 जणांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. यावेळी विघ्नहरचे उपाध्यक्ष अशोक घोलप, माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे, विघ्नहरचे संचालक देवेंद्र खिलारी, सचिन टाव्हरे, धनेश पडवळ, वैभव कोरडे, प्रदिप थोरवे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, नितीन दांगट, अंकुश खंडागळे, सचिन हाडवळे, संतोष सोमोशी, लक्ष्मण शेरकर, सचिन विधाटे, संदिप शिंदे, सुभाष डोके, व हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.

  • आपल्या तालुक्‍यात पाण्याचा गंभीर प्रश्‍न असताना पुढील तीन महिने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून आंदोलन केले.
    – सत्यशील शेरकर, अध्यक्ष, विघ्नहर साखर कारखाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)