सत्तेत नसल्यानेच कोते यांची तगमग

शिवाजी गोंदकर यांचे कैलास कोतेंच्या टीकेला प्रत्युत्तर
शिर्डी – श्री साईबाबा संस्थानने आजवर अनेकदा शिर्डीबाहेर मदतीचा हात दिलेला आहे. परंतु यापूर्वी आपल्याच पक्षाची सत्ता असल्याने विरोधक गप्प बसले. सध्या सत्तेत नसल्याने त्यांची तगमग सुरु आहे, अशा शब्दांत शहर भाजपचे अध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी कॉंग्रेस नेते कैलास कोते यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
कैलास कोते यांनी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्यावर टीकेची तोफ डागत शुक्रवारी आंदोलन केले होते. यावर गोंदकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. त्या म्हटले आहे, की कैलास कोते मागील 18 वर्षांपासून श्री साईबाबा संस्थान व शिर्डी नगरपंचायतीच्या सत्तेत आहेत. त्यांनी त्या काळात शिर्डीसाठी काय केले हे सांगावे. संस्थानच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय, दवाखान्याचा विस्तार का होऊ दिला नाही, कुणाच्या सांगण्यावरून होऊ दिला नाही हे सांगावे. या आंदोलनामागे विरोधकांचा अंतस्थ हेतू वेगळाच आहे. त्यांच्या जमिनी श्री साईबाबा संस्थानने खरेदी केल्या नाहीत म्हणून वैयक्‍तिक स्वार्थापोटी हे सुरु आहे.
शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी विकासकामे करताना कधीही पक्ष बघितला नाही. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिर्डीसाठी सुमारे 321 कोटी रुपये दिले. नगरपंचायतीला मिळालेला स्वच्छतेचा पुरस्कार हा सुरेश हावरे व त्यांच्या विश्‍वस्त मंडळाने मंजूर केलेल्या दरमहा 32 लाख रुपयांच्या निधीमुळेच मिळाला आहे. हा निधी देताना त्यांनी नगरपंचायतीत कॉंग्रेसची सत्ता आहे म्हणून दुजाभाव केला नाही, याकडे त्यांनी पत्रकातून लक्ष वेधले.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनीही याबाबत काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कैलास बापू कोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या आंदोलनाला अतिशय हिणकस वळण दिले. यातून साईबाबांवर श्रद्धा असलेल्या शिर्डीकरांच्या भावना दुखावल्या आहेत. श्री साईबाबा संस्थान हे शिर्डीच्या विकासाची गंगोत्री आहे. तिथून दिला जाणारा निधी हा बाबांचा प्रसाद आहे, असे आम्ही मानतो. मात्र कैलास कोते यांनी संस्थान विरोधात आंदोलन करताना हिंदू परंपरेतील भावनिक गोष्ट असलेली अंत्ययात्रा काढली. गावातून तिरडी मिरवली आणि तिला अग्निडाग दिला. स्वतःऐवजी रिक्षाचालक व इतर गोरगरीब जनतेला डोक्‍यावरचे केस काढून दहाव्याचा विधी करायला लावला. हा हिंदू धर्म परंपरांचा अपमान आहे आणि साईसंस्थान विरोधात हे सर्व केल्याने हा तमाम साईभक्‍तांचाही अपमान आहे.
शिर्डी भाजपच्यावतीने शनिवारी साई संस्थान व सुरेश हावरे यांच्या समर्थनार्थ बैठक आयोजित करण्यात आली होती. दिलीप संकलेचा, गजानन शेर्वेकर, संदीप पारख, जयंती पटेल, रवींद्र गोंदकर, किरण बोऱ्हाडे, रवींद्र कोते, सीताराम सावकारे, कैलास वारुळे, विनायक रत्नपारखी, रमेश बिडये, गणेश जाधव, भैय्या रासने, अमोल कोते, नरेश सुराणा, रवींद्र महाले, मनोज जाधव, विजय हिवाळे, बाळासाहेब शेलार, देवराम सजन, बाळासाहेब थोरात, सुभाष यादगुडे यावेळी उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)