सत्तेतून पायउतार होण्याची वेळ आल्यानंतर पाण्याचा कळवळा

आ. जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला

खटाव, दि. 5 (प्रतिनिधी) – गेली साडेचार वर्षे सत्ता असताना भाजपच्या माण आणि खटाव तालुक्‍यातील विदुषकांना उत्तर माणच्या पाण्याची आठवण झाली नाही. आता सत्तेतून पायउतार होण्याची वेळ आल्यावर त्यांना पाण्याचा कळवळा आला आहे, मात्र मतदारसंघातील जवळजवळ 90 गावात उरमोडीचे पाणी आणणारा आमदार जयकुमारच माणच्या उत्तर भागात पाणी आणेल, असा जनतेतच विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजारबुणग्यांच्या भूलथापांना कुणीच भूलणार नाही, असा विश्वास आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. मतदारसंघात शेतकऱ्यांच्या हक्काचा साखर कारखाना लवकरच उभा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संभुखेड येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नुतन इमारतीचे भुमिपुजन झाल्यानंतर आयोजित वरकुटे-म्हसवड गणाच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष एम. के. भोसले, माजी नगराध्यक्ष विजय धट, सरपंच मनिषा गुरव, दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, विशाल बागल, राजकुमार पोळ, काकासाहेब माने, प्रकाश कापसे, अंकुश शिर्के, जयाप्पा कोळेकर गावोगावचे सरपंच, उपसरपंच यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. गोरे पुढे म्हणाले, निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ज्यांचे आजपर्यंत कधीच जुळले नाही, जे आजपर्यंत कुठेच स्थिर राहिले नाहीत आणि ज्यांनी कोणत्याच गावात एकही विकासकाम केले नाही असे बहुरंगी विरोधक जयकुमारला रोखण्याचा एकमेव अजेंडा घेऊन एकत्र आले आहेत. त्यांना माण, खटावच्या विकासाचे देणेघेणे नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे. उमेद संपल्यावर काहींना इथल्या रोजगाराची, आरोग्याची आणि ग्रीन माणची चिंता वाटायला लागली आहे. मायणी आणि वरकुट्याचे विदुषक आमचे सरकार, आमचे सरकार म्हणून मिरवत आहेत. जिकडे सत्ता तिकडे चांगभल म्हणणाऱ्यांना जनता कधीच थारा देणार नाही.

गेल्या नऊ वर्षात गावोगावी जनतेने मागेल ती कामे पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मतदारसंघातील 90 गावातील अंतर्गत रस्ते मंजूर करण्यात मला यश आले होते. गावोगावी स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालये, पाणी,वीज अशा मूलभूत सुविधांची अनेक कामे आपण मार्गी लावली आहेत. मतदार संघात या जयकुमारने पाणी आणले आणि म्हणूनच चार-चार साखर कारखाने उभे राहिले आहेत. उरमोडीचे पाणी ज्या भागात पोहचले आहे, तिथल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. दिलेल्या शब्दाप्रमाणे मी मतदारसंघात पाणी आणले. आताही लागेल तेव्हा पाणी आणतो आहे. उत्तर माणच्या जनतेलाही आता जयकुमारच पाणी आणू शकतो, असा विश्वास वाटत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढून इथली इंच ना इंच जमीन ओलिताखाली आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एम. के. भोसले, दादासाहेब काळे, शशिकांत गायकवाड, दतात्रेय शिर्के यांनी मनोगत व्यक्त केले. तानाजी ननावरे यांनी प्रास्ताविक केले. विलासराव देशमुख यांनी आभार मानले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)