सत्तेच्या धुंदीत विरोधकांसह प्रशासनालाही कोलदांडा

  • वर्गीकरणाच्या विषयावरून विरोधकांकडून राजदंड पळविण्याचा प्रयत्न
  • 258 कोटींचे विषय गोंधळात मंजूर
  • सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्येही तीव्र मतभेद

पिंपरी – केंद्रात आणि राज्यात सत्तेच्या बळावर भाजप सरकार ज्या पद्धतीने विषय रेटून नेत आहे. त्याचाच कित्ता पिंपरी चिंचवड महापालिकेतही गिरवला जात असल्याचे सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येत आहे. विरोधकांचा विरोध तर हे मोडित काढताताच; परंतु प्रशासनालाही हे पदाधिकारी जुमानत नसल्याचे बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिसून आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये 258 कोटी रुपये वर्गीकरणाच्या विषयांना विरोधकांनी तीव्र विरोध केला. मात्र, महापौर नितीन काळजे हे या सर्व विषयांना मंजुरी देणार असल्याचे लक्षात येताच, सर्व विरोधकांनी व्यासपीठाकडे धाव घेत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात वर्गीकरणाच्या तीनही विषयांना महापौरांनी मंजुरी दिली. विशेष म्हणजे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हे सर्व विषय मागे घेण्याचे पत्र नगरसचिव कार्यालयाला दिले होते. विरोधक व प्रशासनाचा विरोध डावलून अखेर सत्ताधारी भाजपने हे विषय मंजूर केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जून महिन्याची तहकूब सभा बुधवारी (दि. 27) पार पडली. महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. मंगळवारी (दि.19) झालेल्या स्थायी समितीत आयत्यावेळी तब्बल 265 कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचे विषय मंजूर केले होते. तसेच हे विषय महासभेकडे पाठविले होते. बुधवारी (दि. 20) झालेल्या महासभेत तातडीची बाब म्हणून वर्गीकरणाचे विषय आयत्यावेळी दाखल करुन घेतले होते. त्या विषयावर शुक्रवारी (दि. 22) झालेल्या महासभेत चर्चा झाली. त्यामध्ये भोसरी, इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक 8 मध्ये कॉंक्रिटचे रस्ते करण्यात येणार आहेत. त्यासाठी 100 कोटी रुपयांची रकमेची तरतूद केली होती. या विषयावरून सत्ताधारी भाजपच्या स्थानिक नगरसेवकांमध्ये तीव्र मतभेद आहेत. त्यावरून स्थानिक नगरसेविका सीमा सावळे यांनी आयुक्तांना धारेवर धरले होते. त्यानंतर आयुक्तांनी वर्गीकरणाचे पाचही विषय मागे घेण्याचे पत्र दिले होते; परंतु सत्ताधाऱ्यांनी इंद्रायणीनगर येथील रस्त्याच्या कामाची तरतूद शून्य केली. उर्वरित चार विषय विरोधकांचा विरोध डावलून मंजूर केले.

37 विरुद्ध 66 मतांनी मंजूर विषय
तहकूब सभेतील सर्वच विषय मंजूर करण्यास विरोधकांनी विरोध दर्शविला. मात्र, यावर महापौर काळजे यांनी चर्चेची तयारी दर्शविली. तसेच विषय क्र. 20 करिता विरोधकांनी मतदानाची मागणी केली. त्यावर उपसूचनेसह मंजूर करण्याच्या बाजूने 66 तर विरोधाच्या बाजून 37 मतदान झाले. महापौरांनी हा विषय मंजूर केला. त्यानंतर तत्काळ अन्य विषय मंजूर केल्याचे जाहीर करीत, सभा संपल्याचे जाहिर केले. नंतर विरोधकांनी सभागृहात भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

भाजप नगरसेविकेचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर
प्रभागातील विकासकामे करताना आम्हाला विश्‍वासात घेतले जात नाही. ठराविक नगरसेवकांच्या प्रभागातच विकासकामे केली जातात. उपसूचनांच्या कागदावर काय लिहिले आहे, हे शिक्षिका असूनही मला कळत नाही. असा घरचा आहेर भाजपच्या नगरसेविका प्रियंका बारसे यांनी दिला. तसेच प्रत्येक नगरसेवकाला समान न्याय देण्याची गरज असून बोलणाऱ्यांची तोंडं दिसातात, अशा शब्दांत त्यांनी आपली खदखद व्यक्त केली. शिव्या देणाऱ्या नगरसेवकांच्याच प्रभागांत विकासकामे होत असल्याची तक्रार उषा मुंढे यांनी केली.

भाजप नगरसेवकांचाही विरोध
वर्गीकरणाच्या विषयांना विरोधकांसह भाजपच्या अनेक नगरसेवकांनी विरोध दर्शविला. प्रभागातील प्रलंबित विकासकामांची यादीच वाचून दाखवत, नागरिकांकडून याबाबत विचारणा होत असल्याने आयुक्तांनी याठिकाणी भेट देत शहानिशा करावी, अशी मागणी सभागृहात केली. वर्गीकरणाच्या विषयावर भाजप व विरोधक नगरसेवकांचे एकमत यावेळी पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)