सत्तेच्या केंद्रीकरणातून देशावर हुकूमशाही लादण्याचा डाव- अशोक चव्हाण

 सीबीआयसारख्या महत्वाच्या यंत्रणेतही सरकारचा हस्तक्षेप 

लातूर: सत्तेचे केंद्रीकरण करुन लोकशाही धोक्‍यात आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार करीत आहेत. तो डाव उधळून लावणे आवश्‍यक आहे. त्यासाठीच जनतेतील असंतोष संघटीत करण्याचे काम जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्ष करीत असल्याचे कॉंग्रस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेला जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात लातूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, आमदार अमित देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील मान्यवर उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, देशात पुन्हा निवडणुका घ्याव्या लागू नये या पध्दतीने केंद्र सरकारची वाटचाल सुरु आहे. त्यामुळेच सीबीआयसारख्या महत्वाच्या यंत्रणेत गोंधळ निर्माण केला जात आहे. तेथे नियुक्ती करताना मर्जीतल्या लोकांचा विचार केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्तीही एकत्र येवून हुकूमशाही वृत्तीबद्दल आवाज उठवत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेवून सामान्य जनतेनेही मुस्कटदाबी विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. सामान्य जनतेच्या हितासाठी लोकशाही टिकणे महत्त्वाचे आहे.

विद्यमान राज्य शासनानमध्ये मराठवाड्याचे खंबीर नेतृत्व नसल्यामुळे हा विभाग पोरका झाला आहे. येथील अनुषेश वाढतो आहे. शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर या नेत्यांनी मराठवाड्यात अनेक योजना खेचून आणल्या त्यामुळेच हा मागास विभाग विकासाच्या मार्गावर गेला होता. परंतू दुर्देवाने आता सत्तेत या विभागाचे खंबीर नेतृत्व नसल्याने मराठवाड्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, असेही चव्हाण यांनी म्हटले.

शिवराज पाटील-चाकूरकर म्हणाले, कॉंग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले. राजेराजवाडे विविध विभागात विभागलेला देश एकत्र करुन देशाला लोकशाही बहाल केली. संविधान लागू केले. या संविधानाने आपल्या सर्वांना समान संधी मिळाली. आज आपण पाहतोय जगात अनेक ठिकाणी सैनिकी शासन आले, पण भारतात लोकशाही अबाधीत आहे. यात कॉंग्रेसचे योगदान कोणालाही नाकारता येत नाही. देश एक संघ राहावा म्हणून कॉंग्रेस नेतृत्वाने बलिदान केले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यातीलच नाही तर देशातील शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीमाल आयात केल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही. तो मिळावा यासाठीची सरकारकडे यंत्रणाच उपलब्ध नाही. या कारणाने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाच अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेली धोरणे ही चुकीची आहेत, असा घणाघात त्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)