सत्तेचे केंद्रीकरण लोकशाहीसाठी घातक

पुणे – देशांतर्गत आणि सिमेवर सध्या हिंसाचार वाढला आहे, मात्र सत्ताधारी पक्ष हा हिंसाचार सामान्य असल्याचे भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे, तो समाजासाठी धोकादायक आहे. तसेच केंद्रात आणि काही राज्यात व्यक्तींभोवती सत्तेचे केंद्रीकरण करण्यात येत आहे. सत्तेचे हे केंद्रीकरण लोकशाहीसाठी घातक असून बहुमताच्या जोरावर घटना बदलण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचा घणाघाती आरोप दिल्लीतील जेएनयु मधील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांने शुक्रवारी केला.

शनिवारी वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतीक सभागृहात “संविधान की संघ’ विषयावर खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे, त्या पार्श्‍वभुमीवर आयोजीत पत्रकार परिषदेत कन्हैयाकुमार बोलत होता. यावेळी विद्यार्थी नेत्या शहेला रशिद, ऊना आंदोलनातील जिग्नेश मेवानी, तेहसीन पूनावाला उपस्थित होते.
देशातील सद्यपरिस्थितीमध्ये समाजात असहिष्णुता वाढत असल्याचे सांगताना कन्हैयाकुमार म्हणाला, भारतीय राज्यघटना, भारतीय जनतेमधील धर्मनिरपेक्षता या बाबींच्या पूर्णपणे विरोधी असलेल्या पक्षाची सत्ता आलेली आहे, या पक्षाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या बाबींची जाणिवच नसल्यामुळे देशांतर्गत हिंसाचारात वाढ झाली आहे, काश्‍मीरमधील अशांतता, वाढते नक्षली हल्ले हे राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणाचे अपयश आहे. देशातील कोणताही वर्ग सुखी नसून प्रत्येक घटकाचे शोषण होत आहे. याकडे सरकार लक्ष देत नाही, जवानांवर हल्ले, शेतकरी आत्महत्या, विद्यार्थी आत्महत्या ही सर्व लक्षणे हिंसेची लक्षणे असल्याचे सांगताना आमचा कोणा एका राजकीय पक्षाच्या विरोधात लढा नाही, तर फक्त मनुवादी वृत्ती विरोधात लढा आहे, असे त्याने स्पष्ट केले. भविष्यात पतंजलीची वस्तू खरेदी न केल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतील, असा टोलाही त्याने भाजप सरकारला लगावला.

देशामध्ये सामाजिक आंदोलन आणि विरोधी पक्ष नसल्याने सत्ताधाऱ्यांवर निर्बंध राहात नाही. देशातील सर्व शैक्षणिक संस्थांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी थेट संबंध असलेल्या व्यक्तीची नियुक्ती केली जात असून सरकार यातून भगवेकरण करत आहे. असा मुद्दा त्याने उपस्थित केला. भविष्यात कधीही राजकारणात जाणार नसून समाजातील प्रत्येक घटकासाठी लढत राहणार आहे, असे त्याने सांगितले. देशातील जवान सीमेवर दहशतवाद्याशी लढताना शहीद होतात. याच सीमेवर लढताना माझा भाऊ देखील शहीद झाला. देशातील कोणत्या मंत्र्याचा मुलगा सैन्य दलात दाखल झाला आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला.

देशात सध्या अस्तित्वात असलेले सरकार म्हणजे गुजरात मॉडेल असून ते फॅसीझम आणि भांडवलदारांचे पुरस्कर्ते असल्याची टिका जिग्नेश मेवानी याने केली, तर देश सध्या रिव्हर्स गिअरमध्ये गेल्याचे सांगत सध्याचे सरकार दलित आणि मुस्लिमांना दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शहेला रशिद यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)