सत्तेची मस्ती बरी नव्हे!

सर्वसामान्य नागरिकांत दहशत : लोकप्रतिनिधी झालेत “भाई’

अधिक दिवे
पिंपरी – लोकांनी लोकांच्या हिताकरिता लोकांद्वारे चालवलेली व्यवस्था म्हणजे “लोकशाही’. मात्र, देश, राज्य आणि आता शहरातील सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींची वाटचाल “ठोकशाही’कडे होताना दिसत आहे. संबंधित लोकप्रतिनिधी राजरोसपणे कायदा हातात घेऊन कर्मचारी अथवा सर्वसामान्य नागरिकांवर हात उगारत आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी तर रोजची आहे. परंतु, सत्तेची ही मस्ती फार काळ टिकणारी नाही, लोकशाही व्यवस्था समाजातील अशा कथित “भाईंना’ हमाखास घरी बसवते हा इतिहास आहे, ही बाब कथित जनसेवकांनी लक्षात घेतली पाहिजे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या औषध फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याने शहरात खळबळ उडाली आहे. केंदळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी यमुनानगर पोलीस चौकीत ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी मवाळ भूमिका घेऊन अदखलपात्र गुन्हा नोंदविलाही आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 25) सकाळी दहाच्या सुमारास यमुनानगरमध्ये घडला. गणेश जगताप असे मारहाण झालेल्या सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. जगताप हे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा शहरातील शासकीय कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत खुलासा करताना नगरसेवक उत्तम केंदळे म्हटले आहे की, यमुनानगर परिसरात गेल्या तीन महिन्यापासून औषधाची फवारणी केली नाही. त्यामुळे साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जगताप हा फवारणी करण्याऐवजी झाडाखाली बसला होता. तसेच, उद्धटपणे बोलला. त्यामुळे मी त्यांच्या कानाखाली मारल्या आहेत. मात्र, एखाद्या कर्मचाऱ्यावर हात उचलून प्रश्‍न सुटणार आहे का? किंवा महापालिका नियमानुसार त्याच्यावर कारवाई करणे शक्‍य असतानाही “भाईगिरी’ करणे योग्य आहे का? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

भाजपच्या काळातील तिसरी घटना
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर प्रथम राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने महापालिकेतील अधिकाऱ्याला अंगावर शाई फेकली होती. त्यानंतर पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही, याबाबत गाऱ्हाणे घेऊन गेलेल्या नागरिकास घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप भाजपमधील एका नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आला होता. आता यमुनानगरमध्ये भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे यांचे प्रकरण समोर आले आहे. गेल्या दीड वर्षांत थेट आरोप झालेल्या तीन घटना समोर आल्या आहेत. दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या महासभेत महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर पाणी प्रश्‍नाबाबत सर्व पक्षीय नगरसेवकांनी तोंडसुख घेतले. प्रभागातील अनधिकृत नळजोडांना अप्रत्यक्ष खतपाणी घालणारे काही नगरसेवक अधिकारी- कर्मचाऱ्यांना अगदी कपडे फाडून मारण्याची धमकी देतात. नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत यात तिळमात्र शंका नाही, पण त्या समस्या निकालात काढण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, धमकावणे ही पद्धत योग्य नाही. त्याचे समर्थन करणारेही अक्‍कल शून्यच म्हणावे लागतील.

विद्यमान आयुक्‍त “तसे’ धाडस दाखवतील का?
महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता असताना तत्कालीन स्वीकृत नगरसेवक उत्तम हिरवे सफाई कर्मचाऱ्यास मारहाण केली होती. त्यावेळी कामगार संघटनांसह विविध संस्था-संघटनांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली होती. त्यावेळी तत्कालीन आयुक्‍तांनी हिरवे यांचे नगरसेवक पद रद्द केले होते. त्यांना निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरविण्यात आले होते. त्याच न्यायाने विद्यमान आयुक्‍त श्रावण हर्डीकर सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील नगरसेवक किंवा पदाधिकारी मारहाण आणि धमकावण्याची भूमिका घेत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवतील काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

महापालिका कायदा काय सांगतो?
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 482 नुसार महापालिका कर्मचारी हे लोकसेवक आहेत. लोकसेवकास अपशब्द वापरणे, धमकी देणे, मारहाण करणे हे भारतीय दंड विधान कलम 353 नुसार फौजदारी गुन्हा आहे. तसेच, कलम 13 नुसार सभागृहातील एकूण सदस्यांपैकी 2/3 सदस्यांच्या शिफारसीने संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करण्याचा अधिकार राज्य शासना आहेत. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांमधील “भाईगिरी’ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असेल. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात लिहिलेले “लोकशाहीचे मंदिर हे सुंदर, संभाषण घडो मधुर निरंतर’ या सुभाषिताचा अवमान करणाऱ्या सदस्यांविरोधात भूमिका घेण्याची नैतिक जबाबदारी सर्वपक्षीय जनसेवक आगामी काळात घेतील काय? असा प्रश्‍न शहरवासीयांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)